संग्रहित छायाचित्र
वैष्णवी हगवणे यांच्यावरील घरगुती हिंसाचार प्रकरणानंतर अनेक महिलांनी पुढे येत तत्सम तक्रारी दाखल केल्या असून, घरातल्या अत्याचाराच्या या नेहमी दुर्लक्षित राहणाऱ्या समस्येकडे समाजाचे लक्ष वेधले गेले आहे. पुणे शहर पोलिसांची 'भरोसा सेल' ही संकल्पना महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना मदत करणारी एक शांत, पण अत्यावश्यक सुविधा या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पुन्हा चर्चेत आली आहे. ही वाढती तक्रारसंख्या केवळ घरगुती हिंसाचाराचा व्यापक प्रसार दाखवते, तर या पार्श्वभूमीवर बळकट पायाभूत आधार यंत्रणेची तातडीची गरजही अधोरेखित करते.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे म्हणाले, “हगवणे प्रकरणानंतर महिलांकडून पोलीस ठाणे, सहाय्य केंद्रे आणि हेल्पलाईन्सकडे संपर्क वाढला आहे. या प्रकरणामुळे अनेक पीडितांना धैर्य मिळाले आणि त्यांनी गप्प राहण्याऐवजी कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला. आमचा उद्देश केवळ गुन्हा नोंदवणे नसून, तक्रारीची दखल घेऊन सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ती हाताळणे आहे. काही प्रकरणांत दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्यात यश आले आहे. पूर्वी भीती, लोकलाज किंवा पाठिंब्याचा अभाव यामुळे मागे राहिलेल्या महिला आता पुढे येत आहेत. महिला आयोग आणि कायदेविषयक सहाय्य केंद्रांकडेही काउन्सलिंग आणि सल्ल्यासाठी विचारणा वाढली आहे. आम्ही सामाजिक संस्थांबरोबर मिळून काम करत असून, तक्रारदार महिलांना सर्वतोपरी मदत, संरक्षण आणि मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
पूर्वी आठवड्याला १८ नवीन तक्रारी यायच्या, आता हा आकडा ५० ते ८० पर्यंत गेला आहे. या प्रकरणांमध्ये केवळ व्यक्तिगत महिलाच नव्हे, तर महिला आयोग आणि इतर स्वयंसेवी संस्थांकडूनही तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. वैष्णवी प्रकरणानंतर अनेक पालकांनी आपल्या विवाहित मुलींशी संपर्क साधून त्यांच्या कौटुंबिक जीवनाची चौकशी केली आणि त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आता केवळ तक्रार नोंदवण्यासाठीच नाही तर समुपदेशनाद्वारे प्रश्न सुटत आहेत का, हे पाहण्यासाठीही महिला पुढे येत आहेत. - संतोष पंधारे, ‘भरोसा सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
आमच्याकडेही तक्रारींची संख्या वाढली आहे. तक्रारींच्या क्षेत्राधिकारानुसार आम्ही मोठ्या प्रमाणात या प्रकरणांवर काम करत आहोत. - रुपाली चाकणकर, अध्यक्षा, महाराष्ट्र राज्य महिला आयोग
“स्त्रीच्या सुरक्षेचा विचार सर्वप्रथम केला पाहिजे. घरगुती हिंसाचारामुळे नैराश्य, चिंता आणि आत्मविश्वास गमावणे अशा समस्या निर्माण होतात. समुपदेशक म्हणून आम्ही मानसशास्त्रीय आधार, समुपदेशन आणि पुनर्बांधणी यासाठी कार्य करतो.” - अंशुमाला, विश्वकर्मा महिला व बाल समुपदेशक
“१९८० पासून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात असतानाही महिला अजूनही परिस्थितीने पिचल्या जात आहेत, त्यामुळे तक्रारी वाढल्यात हे विशेष नाही. आधी अनेक प्रकरणे सामाजिक कलंक, प्रशासनाच्या अनियमितता व राजकीय हस्तक्षेपामुळे दडपली जात होती. पण, वैष्णवी प्रकरणामुळे आता कोणालाही दुर्लक्ष करता येत नाही. २००५ मध्ये आलेला ‘घटक हिंसाचार कायदा’ तीन महिन्यांत निपटारा व्हावा अशी अपेक्षा ठेवतो. पण प्रत्यक्षात तसे होत नाही. सरकार रस्ते व पायाभूत सुविधांवर कोट्यवधी खर्च करत आहे, पण महिलांच्या सुरक्षेसाठी ‘वन स्टॉप सेंटर’ आजही सुरू नाहीत. महिलांना अत्याचारानंतर आधार कुठे मिळणार?” - किरण मोघे, महिला कार्यकर्त्या
“घरगुती हिंसाचारामध्ये फक्त शारीरिक नव्हे, तर मानसिक, लैंगिक, आर्थिक आणि भावनिक अत्याचाराचाही समावेश होतो. अनेक महिलांना हे समजतच नाही की मानसिक छळदेखील हिंसाच आहे.” - अॅड. वंदना घोडेकर
धोक्याची संकेतचिन्हे
l शरीरावरील समजून न येणारे किंवा वारंवार होणारे जखमा
l कुटुंबीय व मित्रांपासून अलगाव
l जोडीदारासोबत भीती किंवा अस्वस्थता वाटणे
l वागणुकीत किंवा स्वरूपात अचानक बदल
हिंसाचाराचे प्रकार:
| शारीरिक: मारहाण, गुद्दा-चापट, गळा दाबणे
| भावनिक: धमक्या, शिवीगाळ, मानसिक त्रास
| लैंगिक: जबरदस्तीने शारीरिक संबंध, वैवाहिक बलात्कार
| आर्थिक: पैशांवर नियंत्रण, गरजांची पूर्तता न करणे
| डिजिटल: सायबर स्टॉकिंग, ऑनलाइन धमक्या, नजर ठेवणे