संग्रहित छायाचित्र
पुणे: पाणी पिण्याच्या बहाण्याने स्वत:च्या मावशीच्या घरात घुसून चोरी करणाऱ्याच्या पोलिसांनी अवघ्या तीन तासांत मुसक्या आवळल्या. लष्कर पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली.
किरण राजेश कुंटे (वय २८, रा. कॅम्प, पुणे) अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून चोरलेले सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा ओढून घेऊन त्यांच्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एक लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी फिर्यादी यांनी लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता.
पोलिसांनी अज्ञात चोरतट्याचा शोध सुरू केला. फिर्यादी यांच्या घराजवळील बातमीदाराकडून पोलिसांना आरोपी किरण कुंटे याच्याबद्दल माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी मावशीच्या घरी पाणी पिण्याच्या बहाण्याने आल्याचे त्याने संगितले. त्यावेळी मावशीच्या घराचे दरवाजे उघडे असल्याचे दिसले. त्यामुळे तो गुपचुप घरात घुसला. त्याने लोखंडी कपाट उघडले. कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि १० हजाराची रोख रक्कम त्याने चोरून नेली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा हस्तगत केली.
ही कामगिरी अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त दिपक निकम, लष्कर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गिरीश कुमार दिगांवकर, निरिक्षक (गुन्हे) प्रदिप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे उपनिरिक्षक राहुल घाडगे, पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिरडे, प्रविण गायकवाड, लोकेश कदम, सागर हराळ,अलका ब्राम्हणे यांनी केली.