संग्रहित छायाचित्र
पोलीस वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात महिला गंभीर जखमी झाली. ही घटना मंगळवार (दि. ४) दुपारी अडीचला बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथील पोलीस चौकीसमोर घडली. या प्रकरणी वाहनचालक अंमलदाराचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.
नागेश भालेराव (नियुक्ती, हिंजवडी पोलीस ठाणे), असे निलंबित चालक पोलीस अंमलदाराचे नाव आहे. या अपघातात शंकुतला पंडित शेळके (रा. महाळुंगे) या जखमी झाल्या असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मावळ लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी मंगळवारी (दि. ४) बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे पार पडली. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला होता. बंदोबस्त सुरू असताना ड्यूटीवरील अंमलदार नागेश भालेराव शासकीय वाहनात बसले होते. त्यावेळी वाहनाचे इंजिन सुरू होते.
दरम्यान, भालेराव यांचा पाय वेग वाढवण्याच्या पेडलवर (अक्सेलेटर) पडला. त्यामुळे वाहनाने समोरून पायी जाणाऱ्या शकुंतला यांच्यासह उभ्या दुचाकींना धडक दिली. यामध्ये शकुंतला यांना गंभीर दुखापत झाली. तसेच, एका तरुणाच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले.
घटनास्थळी दाखल झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना नागेश भालेराव यांनी मद्य सेवन केले असल्याचा संशय आला. त्यामुळे भालेराव यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये घटनेआधी भालेराव यांनी अल्कोहोलचे सेवन केल्याचे उघड झाले. खात्याच्या वरिष्ठ पातळीवर याची गंभीर दखल घेत भालेराव यांना तडकाफडकी निलंबित केले आहे.
पोलीस अंमलदार नागेश भालेराव यांच्या ताब्यात असलेल्या वाहनाने महिलेसह एका दुचाकीला धडक दिली आहे. यामध्ये पादचारी महिला जखमी झाली आहे. भालेराव यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यामध्ये त्यांनी अल्कोहोल सेवन केले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबन करण्यात आले आहे. तसेच, त्यांची खात्यांतर्गत चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
कन्हैया थोरात, वरिष्ठ निरीक्षक, हिंजवडी पोलीस ठाणे