Swargate Rape Case
पुणे | स्वारगेट आगारात बंद असलेल्या शिवशाही बसमध्ये प्रवाशी तरूणीवर बलात्कार झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दत्तात्रय गाडे याला अटक केली आहे. मात्र घटनेला महिना उलटून गेला तरीही गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल झालेले नाही. तसेच गाडेची डीएनए चाचणी करण्यात आली असून या चाचणीचा अहवालही पोलिसांना अद्यापही उपलब्ध झालेला नाही.
‘गाडे याची डीएनए चाचणी करण्यात आली. न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून अद्याप डीएनए चाचणीचा अहवाल मिळालेला नाही,’ अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली. डीएनए चाचणीचा अहवाल मिळाल्यानंतर गाडेविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. गाडे याचे कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत. गाडेविरुद्ध तांत्रिक, तसेच न्यायवैद्यकीय पुरावे गोळा करण्यात आले आहेत. या प्रकरणात पीडित तरुणीचा जबाब न्यायाधीशांसमोर नोंदवून घेण्यात आला आहे. तसेच, ज्या बसमध्ये गाडेने तरुणीवर बलात्कार केला होता. त्या बसचा चालक आणि वाहक यांचेही जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत.
तरुणीवर बलात्कार करुन पसार झालेल्या गाडेने त्याचा मोबाइल संच फेकून दिला होता. त्याचा मोबाइल संच जप्त करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. मात्र, त्याचा मोबाइल संच सापडला नाही.
स्वारगेट बसस्थानकाच्या आवारातील प्रवाशी तरूणीवरील बलात्काराच्या घटनेचा तपास अंतिम टप्यात आहे. याप्रकरणी लवकरच दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. येत्या काही दिवसांत त्याबद्दल माहिती दिली जाईल, असे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी (२५ मार्च) माध्यमांशी बोलताना सांगितले.
आरोपी गाडे न्यायालयीन कोठडीत
आरोपी दत्तात्रय गाडे मूळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा आहे. बलात्कार केल्यानंतर तो पसार झाला होता. गुनाट गावातील ऊसाच्या फडात तो लपला होता. तीन दिवसांनी गाडेला सापळा रचून आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. गाडेविरोधात भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम पोलीस करत आहेत. तो आता न्यायालयीन कोठडीत आहे.
"आरोपीचा मोबाईल संच शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र मोबाईल संच न सापडल्याने तपासावर कोणताही परिणाम होणार नाही. या प्रकरणात पुराव्याच्या दृष्टीने मोबाईल संच तसा महत्त्वाचा नाही."
- अमितेश कुमार, पोलीस आयुक्त