संग्रहित छायाचित्र
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणींच्या खोलीच्या खिडकीमधून हात घालून मोबाईलवर चित्रीकरण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खोलीमधील तरुणींना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी तरूणावर गुन्हा दाखल केला आहे. विशेष: म्हणजे हा तरुणही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अजित अरुण शिंगोटे (वय ३१, सध्या रा. ओैंदुबर सहवास सोसायटी, शनिवार पेठ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी २७ वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी स्पर्धा परीक्षेची तयारी करते. ती शनिवार पेठेतील एका सोसायटीत मैत्रिणींसह राहण्यास आहे. याठिकाणी त्यांनी एक सदनिका भाडेतत्त्वावर घेतली आहे. आरोपी शिंगोटे हाही याच परिसरातील एका इमारतीत भाडेतत्वावर राहण्यास आहे. साधारणपणे ६ सप्टेंबरपासून आरोपी शिंगोटे खिडकीत उभा राहात होता. या तरुणीसह तिच्या मैत्रिणींकडे पाहत होता. खिडकीत थांबून तो मोबाइलवर नेहमी चित्रीकरण करायचा. ही गोष्ट तरुणी आणि तिच्या मैत्रिणीच्या लक्षात आली. त्यांनी संदर्भात पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
याविषयी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) अरुण घोडके यांनी सांगितले, की आरोपी हाही स्पर्धा परीक्षांची तयारी करीत आहे. तर, फिर्यादी तरुणी आणि तिच्या मैत्रिणीही स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. आरोपी त्यांच्या राहत्या सदनिकेच्या खिडकीमधून मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार, गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मोबाइलवर तरुणींची छायाचित्रे, तसेच चित्रीकरण करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे. नकळत मोबाइलवर चित्रीकरण करून चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित करण्याच्या घटना घडल्या आहेत. असे प्रकार करणाऱ्यांची माहिती त्वरीत पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर करीत आहेत.
आणखी एका आरोपीला अटक
महिलेला मोबाईलद्वारे संपर्क साधत दिल्याप्रकरणी सातारा येथील जहाँगीर नदाफ (वय ४०, रा. उंब्रज, जि. सातारा) याला सिंहगड रस्ता पोलिसांनी अटक केली आहे. पिडीत महिलेने यासंबंधी फिर्याद दिली आहे. ही महिला सिंहगड रस्ता भागात राहते. आरोपी तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. मागील काही दिवसांपासून त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधून अश्लील संवाद साधत होता.