संग्रहित छायाचित्र
किरकोळ वस्तूंची विक्री करुन उदरनिर्वाह करणाऱ्या फिरस्त्या कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.१७ मार्चला शिवाजीनगर भागात ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन तसेच त्यांच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलींच्या आईने याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलींचे कुटुंब फिरस्ते आहे. शिवाजीनगर भागातील चौकात या मुली प्लास्टिक पिशवी, पेन, तसेच फुले यांसारख्या किरकोळ वस्तूंची विक्री करतात. पीडित मुली या सख्ख्या बहिणी आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब हे रस्त्यावर किरकोळ वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करतात. पीडित मुलींच्या बहिणीचा विवाह गुन्हा दाखल झालेल्या अल्पवयीन मुलांच्या नात्यातील एकाशी झाला आहे. त्यामुळे पीडित मुलींशी त्यांची ओळख होती.
१७ मार्चला अल्पवयीन मुले शिवाजीनगर भागात आले. त्यांनी मुलींना गाठले. तुमच्या बहिणीशी भेट घालून देतो, असे सांगून फूस लावून दोघींना दुचाकीवरून मुलींना घेऊन गेले. त्यावेळी या मुलांची आई तेथे होती. मुलांनी दोन्ही अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला. त्यानंतर मुलींनी त्यांना आई-वडिलांकडे सोडण्यास सांगितले. त्यानंतर मुलांनी त्यांना शिवाजीनगर भागात आणून सोडले. घाबरलेल्या मुलींनी झालेला प्रकाराची माहिती आईला दिली. त्यानंतर त्यांच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पीडित मुलींच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक हिरे तपास करत आहेत.
शाळकरी मुलीवर बलात्कार
शाळेत निघालेल्या मुलीला धमकावून तिच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. नगर रस्ता परिसरात हा प्रकार घडला. पीडित मुलीच्या आईने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी एका २३ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाळकरी मुलीचा पाठलाग करीत असे. मुलगी शाळेत जाताना आरोपीने तिला धमकावले. तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला. तिथे आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.