संग्रहित छायाचित्र
पुणे: गरज आणि हौस म्हणून वाहने खरेदी केली जात असल्याने गेल्या काही वर्षांतील वाहन विक्रीचे आकडे विक्रमावर विक्रम करत आहेत. कोरोना सोडला तर वाहनांच्या विक्रीचा आलेख चढाच राहिला आहे. वाहन खरेदीबरोबर शहरातून होणाऱ्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तीन वर्षांमध्ये जवळपास पाच हजारांपेक्षा अधिक वाहने चोरीला गेली असून यातील अवघी दीड हजार वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. दुर्दैवाने चोरीला गेलेल्या वाहनांच्या तुलनेत तपासाचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. अत्याधुनिक साधनसुविधा आणि तंत्रज्ञान सोबत असतानाही पोलिसांना या गुन्ह्यांचा छडा लावण्यात फारसे यश येताना दिसत नाही. यामुळे चोरट्यांचे फावले असून आता वाहन चोरीची इंडस्ट्री कोटीच्या घरात पोहोचली आहे.
कधी बँकेमार्फत तरी कधी फायनान्स कंपन्यांचे कर्ज काढून, कधी पदरमोड करून नागरिक वाहने खरेदी करतात. गाडी ही गरजही झाली आहे आणि हौस देखील. स्व-मालकीची वाहने सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र, खरेदीनंतर वर्ष-दोन वर्षात वाहन चोरीला गेले की मालकाला रुखरुख लागते. वाहन चोरीची तक्रार दाखल केली तरी वाहन पुन्हा मिळण्याची शाश्वती वाटत नसते. त्याचे एक कारण म्हणजे वाहनचोरीच्या गुन्ह्यांकडे पोलीस अभावाने गांभीर्याने पाहतात. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. चोरीची वाहने परराज्यात आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विकली जात आहेत. यामधून चोरट्यांची तात्पुरती गरज भागत असल्याने वाहन चोरीचा उद्योग असा फोफावला गेला आहे.
सोसायट्यांच्या आवारामधून, सार्वजनिक ठिकाणांवरून, हॉटेलच्या बाहेरून वाहने, बाजारपेठेमधून वाहने चोरीला जाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. कधी कुठून गाडी चोरीला जाईल याचा काही नेम राहिलेला नाही. पुण्यामधून दिवसाला साधारणपणे सात ते आठ वाहने चोरीला जातात. यामध्ये दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाहन चोरीचे वाढलेले प्रमाण पाहता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीला गेलेली वाहने शोधण्याचे तसेच या वाहनांचे नंतर नेमके काय होते, याचा शोध घेण्याचे ‘कर्तृत्व’ मात्र पोलीस दाखवताना दिसत नाहीत. सर्वसामान्यांना वाहनचोरीचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. अनेकांनी फायनान्स कंपन्यांचे मोठ्या व्याजदराचे कर्ज घेऊन वाहने घेतलेली असतात. त्यांची वाहने चोरीला गेल्यानंतर या बँका मात्र त्यांच्या मागचा तगादा सोडत नाहीत. शहरातून चोरलेली वाहने राज्याच्या विविध ग्रामीण भागात तसेच परराज्यात नेऊन विकण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच, चोरीमारीचे गुन्हे करण्यासाठी या चोरीच्या वाहनांचा वापर केला जातो. काही वर्षांपूर्वी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या बॉम्बस्फोटासाठी सातारा न्यायालयाच्या आवारामधून एका पोलिसाची मोटारसायकल चोरण्यात आली होती. ही मोटारसायकल स्फोट घडविण्यासाठी वापरण्यात आली होती.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची दाणादाण उडाली आहे. त्यातच रिक्षाचालक आणि कॅबचालकांची मुजोरी वाढत चालली आहे. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी तसेच सोईचे असल्याने मोटारसायकल किंवा गाडी खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. पुण्यामध्ये परराज्यामधून आणि परजिल्ह्यामधून नोकरी-व्यवसाय-शिक्षणासाठी आलेल्यांच्या वाहनांची भर पडलेली आहे. परिणामी, पुण्यातील वाहनांची संख्या ५५ लाखांच्या वर गेली आहे. त्यामुळे शहरातील पार्किंग समस्येने विक्राळ रूप धारण केले आहे. सुरक्षित पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्यावर कुठेही गाडी लावली जाते. मग, वाहतूक पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागते. यासोबतच, वाहन चोरीला जाण्याच्या घटना घडतात. शहरात वाहन चोरीच्या वेगवेगळ्या टोळ्या कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये अनेकदा वाहन चोर पकडले जातात. त्यांच्याकडून काही दुचाकीही जप्त केल्या जातात. मात्र, यामधील बरेचसे तरुण हे मौजमजेसाठी आणि आपल्या गरजा भागवण्यासाठी वाहन चोऱ्या करीत असल्याचे तपासात समोर आलेले आहे. वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचेही अनेकदा समोर आलेले आहे. काही वर्षांपूर्वी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये एका पोलीस निरीक्षकाच्या मुलाला आणि डॉक्टर दांपत्याच्या मुलाला पकडण्यात आले होते. अल्पवयीन मुलांसह तरुणांमध्ये मौजमजेसाठी दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. विशेषत: महाविद्यालय विद्यार्थी आणि १७ ते ३० या वयोगटातील तरुण वाहन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक सक्रिय आहेत. ज्यांची वाहने सापडतात त्यांना ती परत केली जातात. मात्र, ज्यांची वाहने सापडत नाहीत अशा नागरिकांना पुन्हा नवीन दुचाकी खरेदी कराव्या लागतात. त्यामुळे वाहन कंपन्यांचाही फायदा होतच आहे.
कशी केली जाते विक्री?
वाहने चोरल्यानंतर हे चोरटे विविध जिल्ह्यातील तसेच परराज्यातील एजंटशी संपर्क करतात. त्यांच्यामार्फत ही वाहने परराज्यात पोहोचविली जातात. कधी रेल्वेने तर कधी बसने ही चोरीची वाहने नेली जातात. यासोबतच दुचाकी चोरटे स्वत:च वाहन चालवीत नेतात. साधारणपणे १५ हजारांपासून पुढे ही वाहने विकली जातात. चोरीच्या गाडीची नंबर प्लेट, चेसिस, इंजिन नंबर बदलून चोरटे गाडीची विक्री करत असल्याने गाडीचा शोध घेणे पोलिसांना अवघड होऊन बसते. बनावट कागदपत्रांद्वारे चोरीच्या गाड्यांची आरटीओ कार्यालयात नोंदणी, पासिंगही केली जाते. जेणेकरून गाडी खरेदीदारास कोणताही संशय येऊ नये.
कशी होते वाहनांची चोरी ?
हँडल लॉक केलेल्या दुचाकीचे हँडल पायाने किंवा हाताने जोरात झटका देऊन तोडले जाते. त्यानंतर वाहनाचा स्विच वेगळा केल्यानंतर क्षणार्धात वाहन सुरू होते. वाहन चोरट्याकडे ‘मास्टर की’ नावाची चावी असते. तिचा वापर करून कोणतेही वाहन चोरटे वाहन सुरू करून पसार होतात. या चाव्या बनविणार्या दुकानदारांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच चोरीच्या दुचाकींवर बनावट नंबर प्लेट लावून चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनांवर बनावट नंबर प्लेट बसविण्यासाठी मदत करणाऱ्या दुकानदारांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याचीही आवश्यकता आहे. चोरीची वाहने घेऊन ती तोडून भंगारात विकणार्या भंगार दुकानदारांची तपासणी होणेही आवश्यक आहे.