पुणे : इंस्टाग्रामवर तरुणीशी ओळख वाढवून तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिच्याकडून अडीच तोळ्याची सोन्याची चेन बघण्यासाठी घेतली. तरुणीने चेन परत मागितल्यावर तरुणाने इंस्टाग्रामवर बनावट अकाऊंट तयार करून त्यावरून फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तरूणींच्या वडिलांकडून पैशांची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याबाबत एका २१ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सौरभ विलास धोत्रे (वय २५, रा. दिपबंगला चौक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मे २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान हा प्रकार घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी सौरभ धोत्रे यांची इंस्टाग्रामवर ओळख निर्माण झाली. त्याने तरुणींकडून बघण्यासाठी तिच्याकडील सोन्याची चेन घेतली. मात्र ती चेन परत देण्यासाठी तिला जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यावर आरोपीने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. सोन्याची चेन परत न दिल्याने तिने त्याच्याशी बोलणे व भेटणे टाळले. तेव्हा धोत्रे याने त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादी तरुणीच्या नावे बनावट इंस्टाग्राम आयडी तयार केला. त्यावर तिचे व त्याचे सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
वडिलांकडून पैशांची मागणी…
सौरभ धोत्रे हा तिच्या वडिलांच्या दुकानावर गेला. त्याने त्यांच्याकडून ७० हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जाधव तपास करीत आहेत.


