प्रातिनिधिक छायाचित्र....
पुणे : पुण्यातील आयटी अभियंता तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन बलात्कार करून, तिच्यावर आळीपाळीने चौघांनी सामूहिक अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तरुणीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून 30 लाख रुपये, दोन आयफोन उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कांदिवली मुंबई येथील फॅब हॉटेल स्प्रिंगइन तसेच कारमध्ये घडला आहे.
याप्रकरणी 33 वर्षीय तरुणीने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तमीम हरसल्ला खान (रा. कांदिवली) आणि त्याचे इतर तीन मित्र अशा चौघांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक कृत्य, फसवणूक, अपहार, धमकावून मारहाण अशा कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कांदिवली येथे घडल्याने गुन्हा पुढील तपासासाठी कांदिवली पोलिसांत वर्ग करण्यात आला.
नेमंक काय घडलं....
माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची कर्नाटकातील आहे. आयटी क्षेत्रात नोकरी करत असल्यामुळे ती पुणे शहरात वास्तव्यास आहे. 2021 मध्ये तिची फेसबुकच्या माध्यमातून आरोपी खान याच्यासोबत ओळख झाली होती. खान याने त्याच्या वडिलांचा मोठा बांधकाम व्यवसाय असून, तो सर्व पाहत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोघांची ओळख वाढत गेली.
पुढे लग्नाच्या आमिषाने खान याने तरुणीला जाळ्यात खेचले. त्यातूनच ती त्याला भेटण्यासाठी कांदिवलीत गेली. येथील एका हॉटेलमध्ये दोघे भेटले. त्यावेळी खान याने शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तरुणीवर बलात्कार केला. तिला कारने नेऊन मुंबई आणि पुणे येथे बलात्कार केला. खान तरुणीवर कारमध्ये अत्याचार करत असताना, त्याने अन्य मित्रांना बोलावून घेतले. तिघांनी तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केला. आरोपींनी तरुणीचे अत्याचार करतानाचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.
त्यानंतर तरुणीकडून एकूण 30 लाख रुपये उकळले. दरम्यान, तरुणीने दिलेले पैसे खान याच्याकडे परत मागितले असता, त्याने तरुणीला मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कांदिवली पोलिस करीत आहेत.