संग्रहित छायाचित्र
पुण्यातील टेकड्या सुरक्षेच्या दृष्टीने असुरक्षित ठरू लागल्या आहेत. अनेकदा टेकड्यांवर तरुणांना लुटण्याच्या घटना घडतात. मित्रासोबत फिरायला गेलेल्या नागालँडमधील महाविद्यालयीन तरुणाला बेदम मारहाण करून लुटण्यात आल्याची घटना बाणेर टेकडी परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वारंवार अशा घटना घडत असतानाही पोलिसांची गस्त कमी पडत असल्याचे चित्र दिसत आहे.
पीजेंदाई कामेई (वय १९, सध्या रा. आनंदनगर, जुनी सांगवी, मूळ रा. नागालँड) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत कामेई याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कामेई आणि त्याचा मित्र शनिवारी सायंकाळी बाणेर टेकडीवर फिरायला गेले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास कामेई आणि त्याच्या मित्राला चाैघांनी अडवले. त्याला मारहाण करून चोरट्यांनी शस्त्राने पायावर वार केला. त्याच्याकडील २० हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण चौगुले तपास करत आहेत. यापूर्वी पाषाण-सूस रस्त्यावरील टेकडी परिसरात लूटमारीच्या घटना घडल्या होत्या.
तंबाखूसाठी तरुणाला लुटले
प्रवासी तरुणाला मारहाण करून चोरट्यांनी त्याच्याकडील पिशवी लंपास केली. नगर रस्त्यावरील खराडी जकात नाका रविवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. आकाश बाबासाहेब आगळे (वय २०, रा. विठ्ठलनगर, खराडी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरक्षारक्षक म्हणून काम करणारे आकाश रविवारी मध्यरात्री छत्रपती संभाजीनगरला निघालेले होते. दुचाकीवरून आलेल्या चौघा चोरट्यांनी सुरुवातीला तंबाखू मागितली. तंबाखू नसल्याचे सांगत असतानाच आरोपींनी त्यांच्या डोक्यात हातोडी मारली. त्यांची पिशवी हिसकावत चोरटे पसार झाले.