पुणे : आरपीआयच्या शहराध्यक्षाला जिवे मारण्याची धमकी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) शहराध्यक्ष परशुराम वाडेकर यांना जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कौटुंबिक वादामधून पत्नीची बाजू न घेण्यासाठी प्रसिद्ध रेडियोलॉजिस्टने ही धमकी दिली. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील एका खासदाराचा ‘पीए’देखील त्यावेळी सहभागी झाला होता. या प्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. २६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Parshuram Wadekar)
हा प्रकार २२ ऑगस्ट रोजी दुपारी एकच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात घडला. डॉ. अमित कस्तुरीलाल लुथरा (रा. थ्री मार्बल प्लाझा, विमाननगर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आरपीआयचे शहराध्यक्ष परशुराम बाळकृष्ण वाडेकर (वय ५३, रा. कुंदन हेरिटेज, खडकी) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेसह अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. लुथरा आणि त्यांची पत्नी डॉ. सुरभी भाटिया यांच्यामध्ये कौटुंबिक वाद आहेत. वाडेकर यांना दातांचा त्रास जाणवत असल्याने ते दंतचिकित्सकाच्या शोधात होते. त्यांना त्यांच्या एका मित्राने डॉ. सुरभी यांच्याकडे पाठवले. त्या दातांच्या डॉक्टर आहेत.
वाडेकर यांच्यावर उपचार करीत असताना डॉ. सुरभी यांनी आपल्याला पती आणि सासरे त्रास देत असल्याबाबत सांगितले. त्याविषयी मदत करण्याची विनंती केली. त्यावेळी वाडेकर यांनी पक्षाच्या नावाने अर्ज करण्यास सांगितले. त्यानुसार, डॉ. सुरभी यांनी आरपीआयच्या नावाने अर्ज केला. तसेच, पतीच्या त्रासापासून सुटका करण्याची विनंती केली. वाडेकर यांनी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांशी बोलून याविषयी कारवाई करण्यासंदर्भात अर्ज दाखल केला.
वाडेकर यांना एका माजी नगरसेवकाने आरपीआयच्या एका माजी नगरसेविकेला फोन करून या विषयात पडू नका, असा निरोप दिला. तसेच, सातारा येथून एका खासदाराच्या स्वीय साहाय्यकानेदेखील वाडेकर यांना फोन करून या विषयात पडू नका असे सांगितले. वाडेकर यांनी या स्वीय साहाय्यकाला भेटण्यासाठी पुण्यात बोलावले. त्यानुसार, २२ सप्टेंबर रोजी सात ते आठ लोक सातारा येथून शासकीय विश्रामगृहात आले. त्यावेळी डॉ. लुथरा हेदेखील त्यांच्यासोबत होते. त्यावेळी त्यांनी ‘‘या विषयात पडू नको,’’ अशी दमबाजी करण्यास सुरुवात केली. तसेच, बघून घेण्याची धमकी दिली. त्यावेळी वाडेकर आणि डॉ. लुथरा यांच्यामध्ये वादावादी झाली. आपल्या जिवाला धोका असल्याची जाणीव झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून वाडेकर यांनी पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
बनावट सह्या करून मालमत्ता हस्तांतरित केल्याचा आरोप
लुथरा दाम्पत्याला ९ वर्षांची मुलगी आणि दीड वर्षांचा मुलगा आहे. २०२१ मध्ये या कंपनीची सुरुवात करण्यासाठी आणि घर खरेदी करण्यासाठी सर्व पैसे डाॅ. सुरभी यांनी स्वत: गुंतवले होते. या दोन्ही मालमत्ता एकत्र असतील, असे ठरले असतानादेखील डॉ. लुथराने या मालमत्ता बनावट सह्या करून स्वत:च्या नावावर हस्तांतरित केल्याचा आरोपदेखील त्यांनी केला होता. डॉ. लुथरा यांनी त्यांच्या पत्नीला कायमच सीसीटीव्हीच्या देखरेखीखाली ठेवले. त्यांचा मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटले होते. पीडितेच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी डॉ. लुथरा आणि त्यांचा भाऊ राजीव लुथरा यांच्यावर भारतीय दंड संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पीडित महिलेने याविषयी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडेही तक्रार दाखल केली होती. आता या प्रकरणात थेट एका राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाला धमकावण्यात आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
यापूर्वी दाखल आहे कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा
यापूर्वी रेडिओलॉजिस्ट असलेल्या डॉ. अमित लुथरा यांच्यावर त्यांच्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचार, बनावटीकरण आणि फसवणुकीची तक्रार दिली होती. त्यानुसार, विमानतळ पोलिसांनी जुलै २०२३ मध्ये गुन्हा दाखल केला होता. डॉ. लुथरा आणि डॉ. सुरभी यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. लग्नानंतर हे दाम्पत्य नाशिकला गेले असता डॉ. लुथरा यांच्या बहिणीने पीडितेला घराबाहेर काढल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते. पुण्यात आल्यानंतर डॉ. लुथरा यांनी पीडितेच्या पालकांकडून ५० लाख रुपये आणण्याची मागणी केली होती. तसेच त्यांच्या कुटुंबाकडून महागडी गाडी, सोन्याचे दागिने आणि रोख रकमेची वेळोवेळी मागणी केल्याचा तसेच या सर्व वस्तू घेतल्याचा आरोप पत्नीने केला होता. तिच्या वडिलांनी दिलेल्या पैशातून त्यांनी विमाननगरमधील फ्लॅट आणि दवाखान्याची जागा खरेदी केली. या दाम्पत्याने एक खासगी कंपनी स्थापन केली होती. ज्यात पाच डॉक्टर आणि नऊ कर्मचारी काम करीत होते. डॉ. लुथरा यांनी कंपनी स्थापन करताना तिच्या सह्यांचा बनावट वापर केल्याचा आरोपदेखील पत्नीने केला होता.