पुणे : Pune Police पुणे पोलीस दलातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. एका शाळेच्या प्राचार्य महिलेला ब्लॅकमेल करून तब्बल ७ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस आयुक्तांनी तातडीने कारवाई केली आहे.
या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक अजित बडे (PSI Ajit Bade), कर्मचारी सुदाम तायडे (Sudam Tayade) आणि दामिनी पथकातील रील स्टार म्हणून ओळखली जाणारी सोनाली हिंगे (Sonali Hinge) यांचा समावेश आहे. तिघांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्राचार्यांना पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्याची भीती दाखवण्यात आली. या भीतीचा गैरफायदा घेत आरोपींनी तब्बल ७ लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तात्काळ दखल घेत कारवाईचे आदेश दिले. घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून, ‘दामिनी पथका’तील कर्मचाऱ्याचे नाव समोर आल्याने प्रकरण अधिक गंभीर मानले जात आहे.
अजित बडे, सोनाली हिंगे, सुदाम तायडे, पोलिस उपनिरीक्षक बडे हा सद्या सायबर पोलिस ठाण्यात नेमणुकीस आहे. तर हिंगे ही शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दामिनी मार्शल म्हणून कार्यरत आहे. सोशल मीडियावर देखील रिलस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. तर सुदाम तायडे हा देखील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. दरम्यान पोलिसांच्या या खंडणीखोरीच्या प्रकारामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


