संग्रहित छायाचित्र
दुबईला औषधांची निर्यात करण्याच्या बहाण्याने एका औषध वितरकाची चार कोटी ४० लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, आरोपींनी आणखी काही जणांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
याबाबत नीलेश सोहनलाल सोनिगरा (वय ४६, रा. मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनाली गिरिगोसावी (वय ४२, रा. कोहिनूर ग्लोरी सोसायटी, महंमदवाडी ) आणि जयेश वसंत जैन (वय ४१, रा. भक्तिपूजा अपार्टमेंट, महर्षीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारः तक्रारदार नीलेश सोनिगरा यांचे सदाशिव पेठेत न्यू अमर फार्मास्युसिटकल्स म्हणून औषधेविक्रीचा व्यवसाय आहे. पुण्यातील औषधविक्रेते आणि रुग्णालयांना ते औषधांचा पुरवठा करतात. २०२० मध्ये सोनिगरा यांची सोनाली गिरिगोसावी हिच्याशी ओळख झाली. तिचे ओम साईनाथ मेडिकल हे औषध विक्रीचे दुकान आहे.
सोनिगरा तिला उधारीवर औषधे द्यायचे. गिरिगोसावी हिने सोनिगरा यांची नोव्हेंबर-२०२४ मध्ये जयेश जैन याच्याशी ओळख करून दिली. त्याचे गुरुवारपेठेत त्याचे सृष्टी हेल्थकेअर हे औषधे विक्रीचे दुकान आहे. जयेश जैन याने माझी दुबई येथील एका कंपनीच्या संचालकाबरोबर ओळख आहे. त्यांना मोठ्या प्रमाणावर औषधांच्या साठ्यांची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यावर जयेश जैन हा घाऊक विक्रेता आहे. तो व्यवहारात फसवणार नाही, असे गिरिगोसावी हिने सोनिगरा यांना सांगितले.
सोनिगरा यांनी तिच्यावर विश्वास ठेवून १३ मार्च ते ८ मे २०२५ या कालावधीत ४ कोटी ४० लाख ३५ हजार ९०५ रुपयांची औषधे एक महिन्याच्या उधारीवर गिरिगोसावीच्या ओम साईनाथ मेडिकल्सच्या नावाने दिली. त्यासाठी तिने ६० चेक दिले होते. त्यानंतर ती पैसे देण्यास टाळाटाळ करू लागली. बँकेत चेक जमा करतो, असे सोनिगरा यांनी तिला सांगितले. तेव्हा खात्यात पैसे नसल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिने सोनिगरा यांच्याशी संपर्क तोडला.
संगनमत करून फसविले
फिर्यादी सोनिगरा यांनी चौकशी केली असता सोनाली गिरिगोसावी हिने आणखी एका औषध विक्रेत्याकडून उधारीवर ८३ लाख ३८ हजार रुपयांची औषध घेऊन त्याची फसवणूक केल्याची माहिती त्यांना मिळाली. तसेच तिने जयेश जैन याच्याशी संगनमत केले. सोनिगरा यांच्याकडून घेतलेली औषधे तिने जैन याच्या औषध विक्री दुकानात दिल्याचे उघडकीस आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण घोडके तपास करत आहेत.