प्रातिनिधिक छायाचित्र....
सदनिकाधारकासह एजंटविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पुणे : सदनिका खरेदीच्या व्यवहारात ज्येष्ठाची २५ लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणी नितीन सुधाकर सोनवणे, महादेव माणिकराव गिराम आणि दत्तात्रय भागुजी हिंगणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अशोक नामदेव कुंभार (वय ६०, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता, पुणे) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जुलै २०२३ ते २५ मार्च २०२५ या कालावधीदरम्यान हा प्रकार घडला. फिर्यादी कुंभार यांना सदनिका खरेदी करायची होती. त्यांनी त्यांच्या ओळखीचे रियल इस्टेट एजंट नितीन सुधाकर सोनवणे यांना सदनिका शोधून देण्याबाबत सांगितले होते. त्यानंतर सोनवणे आणि महादेव माणिकराव गिराम यांनी दत्तात्रय भागुजी हिंगणे यांची वडगाव बुद्रुक येथील नवले पुलाजवळील सदनिका विक्रीस असल्याचे कुंभार यांना सांगितले. तसेच त्यांना ती सदनिका दाखविली.
या सदनिकेची किंमत एक कोटी ५० लाख असल्याचे कुंभार यांना सांगण्यात आले. त्यांच्यामध्ये सदनिकाखरेदीचा व्यवहार ठरला. फिर्यादी यांनी २५ लाख रुपये दिले. मात्र रियल इस्टेट एजंट आणि हिंगणे यांनी सदनिका विक्रीचा व्यवहार पूर्ण केला नाही. ही सदनिका दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचे उघडकीस आले. तसेच दिलेली रक्कम फिर्यादी यांना परत न करता त्यांची फसवणूक करण्यात आली. त्यामुळे कुंभार यांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगुडे, निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे आणि उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक जायभाय पुढील तपास करीत आहेत.