Pune | बनावट कंपनी स्थापन करून कोट्यवधींचा गंडा, तब्बल ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक

बनावट कंपनी स्थापन करून लोकांची वाहने भाडे तत्वावर घेऊन ती वाहने परस्पर विकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Tue, 25 Mar 2025
  • 02:49 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

प्रातिनिधिक छायाचित्र....

भाडेतत्वावर वाहने घेऊन परस्पर विकल्याचे आले समोर;  वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : बनावट कंपनी स्थापन करून लोकांची वाहने भाडे तत्वावर घेऊन ती वाहने परस्पर विकण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तब्बल ११० लोकांची २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी संकेत सुधीर थोरात (वय ३०, रा. हांडेवाडी), सोनु नवनाथ हिंगे (वय २९), रिजवान फारुख मेमन  (वय ४४, रा. गणेश पेठ) यांना अटक केली आहे. प्रणय उदय खरे (वय ३२), वृषाली संतोष रायसोनी (वय २४, रा. बिबवेवाडी), विजय चंद्रकांत आशर (वय ६५, रा. ईस्कॉन मंदिराजवळ, टिळेकरनगर, कोंढवा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ज्ञानेश खंडु शिंदे (वय २४, रा. अवसरी बु़ ता. आंबेगाव) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार वानवडीतील जगताप चौक येथील सेक्रेड वर्ल्ड इमारतीमधील शॉपमध्ये ऑक्टोंबर २०२४ पासून आतापर्यंत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घनकचरा व्यवस्थापनाशी निगडीत विविध बनावट कंपन्या स्थापन करुन लोकांना गुंतवणूक करण्यास लावले. ही वाहने भाडेतत्वावर घेतली जातील असे आश्वासन देऊन कार, दुचाकी, बुलडोजर सारखी वाहने लोकांना खरेदी करण्यास भाग पाडले. ही वाहने खरेदी करून त्यांची परस्पर विक्री केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. फिर्यादी शिंदे आणि आरोपी हिंगे हे एकमेकांच्या परिचयाचे आहे. हिंगे याने आपण बायो फिक्स प्रो कंपनीचा व्हेंडर असल्याचे शिंदे यांना सांगितले. ही कंपनी घनकचरा व्यवस्थापनाचे काम करत असून कंपनीला एका बुलडोजरची आवश्यकता असल्याचे त्याने सांगितले. हा बुलडोजर कंपनी  भाडेतत्वावर घेणार आहे.  कंपनी दरमहा १ लाख ३० हजार रुपये भाडे देणार आहे. तसेच जीएसटीही कंपनीच ७ वर्षे भरणार असे हिंगे याने सांगितले. ही स्कीम चांगली वाटल्याने फिर्यादी शिंदे यांनी १४ डिसेबर २०२४ रोजी ३९ लाख रुपयांना  बुलडोजर खरेदी केला. तो दुसऱ्या दिवशी बायोफिक्स प्रो कंपनीस भाडेतत्वावर वापरण्यास दिला. त्यांना भाडेपोटी जानेवारी २०२५ मध्ये ६० हजार रुपये देण्यात आले.

मात्र त्यानंतर फिर्यादी शिंदे यांना उर्वरित रक्कम देण्यात आली नाही. तसेच बुलडोजर कुठे आहे हे देखील त्यांना सांगितले जात नव्हते. त्यांना त्यांचे बुलडोजर उंड्री येथील एका गोदामात आढळले. त्यांनी आरोपी रिजवान  मेमन  याच्याकडे चौकशी केली. त्यावर दर्पण ठक्कर यांच्या मध्यस्थीने अनेक बुलडोजर, पॉकलॅन्ड खरेदी केल्याचे त्याने सांगितले. 

चांगले भाडे देण्याच्या आमिषाने अपहार

आरोपींनी बायोपिक्स प्रो ग्लोबल मुफेडको, म्युफ्याको कंपनी व भारत इंडस्ट्रिज कंपनी यामध्ये गुंतवणूकदारांना चांगले भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यांना गाड्या खरेदी करण्यास भाग पाडून भाड्यापोटी ठरलेली रक्कम न देता त्यातील काही गाड्यांचा परस्पर अपहार केल्याचे चौकशीत समोर आले. तसेच काही गाड्यांचे स्पेअर पार्ट बाजारामध्ये भंगारात विक्री केली आहे.

१५० गुंतवणुकदारांची फसवणूक

या फसवणुकीत १५० हून अधिक गुंतवणूकदार अडकल्याचे उघड झाले आहे.  या सर्वांनी वानवडी पोलीस ठाण्यात सामाईकरित्या तक्रार अर्ज दिला.  अनेकांना कार, छोटा हत्ती, टेम्पो, जेसीबी, ऑरगॅनिक वेस्ट कम्पोस्टर मशीन अशा वस्तू खरेदी करायला लावल्या.सोनु हिंगे व संकेत थोरात त्यांच्या सांगण्यानुसार ही वाहने कंपनीकडे भाडेतत्वावर वापरण्यास दिली. त्याचे भाडे दिले नाहीच उलट ही वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून जवळपास २ कोटी ६६ लाख ९५ हजार ३०२ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी वानवडी पोलिसांकडे आतापर्यंत मिळाल्या आहेत. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) गोविंद जाधव तपास करीत आहेत.

Share this story

Latest