प्रातिनिधिक छायाचित्र...
खडक पोलिसांत खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल...
पुणे : हॉर्न वाजविल्याच्या वादातून ‘आम्ही इथले भाई’ असे म्हणत एका टोळक्याने भावा-बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. टोळक्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत तिघे जण जखमी झाले. भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरात शनिवारी (२७ एप्रिल) हा प्रकार घडला. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
या मारहाणीत करण ललित केसवाणी (वय २८), भाऊ हर्ष आणि बहीण निकिता हे जखमी झाले आहेत. तसेच करण यांचे आजोबा भारत यांनानी टोळक्याने शिवीगाळ करीत धक्काबुक्की केली. याबाबत करण यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शोएब उमर सय्यद (रा. कासेवाडी, भवानी पेठ) याच्यासह पाच ते सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसवाणी कुटुंबीय हे गुरुनानकनगर भागात जीवनज्योती सोसायटीत राहायला आहेत. फिर्यादी करण यांचा भाऊ हर्ष शनिवारी (२७ एप्रिल) भवानी पेठेतील गुरुनानकनगर परिसरातून दुचाकीवरून जात होता. त्याने हॉर्न वाजविल्याने आरोपी शोएब आणि हर्ष यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी हर्ष याला शिवीगाळ केली. त्याच्या कानाखाली हाताने मारले. तसेच त्याचे कपडे फाटेपर्यंत त्याला मारहाण केली. हा सगळा प्रकार सुरू असताना झालेला आरडाओरडा ऐकून करण, त्यांची बहिण निकिता, आजोबा भारत हे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर आले. त्यांनी आरोपींनी जाब विचारला. तेव्हा आरोपींनी करण, बहिण निकिता, आजोबा भारत यांना शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की केली. ‘आम्ही या भागातील भाई आहोत. इथे फक्त आमचेच चालते’ असे म्हणत त्यांनी धमकी दिली. त्यानंतर शोएबने हर्षला जीवे मारण्याच्या इराद्याने त्याच्या डोक्यात दगड घातला. डोक्याला दगड लागल्याने हर्ष गंभीर जखमी झाला. त्याच्या डोक्यातून रक्तस्राव होवू लागला. तरी देखील टोळक्याने हर्ष यांना मारहाण करणे चालू ठेवले
जाळून टाकण्याची धमकी
करण आणि निकीता यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना दगड फेकून मारले. निकीता हिच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. करण यांचे आजोबा भारत यांनाही शिवीगाळ केली. तसेच आरोपींनी करण यांना घर जाळून टाकण्याची धमकी दिली. तसेच सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दहशत माजविली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहायक आयुक्त अनुजा देशमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, गुन्हे शाखेच्या निरीक्षक शर्मिला सुतार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.