Advertisement

Pune | माता न तू वैरिणी..! शिरूरमध्ये आईनेच केली ११ महिन्याच्या मुलाची हत्या; संतापजनक कारण आले समोर….

दगड बांधून विहिरीत फेकला मृतदेह; आरोपी आईला करायचे होते तिसऱ्यांदा लग्न…

पुणे | माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना पुणे जिल्ह्याील शिरूर तालुक्यातून समोर आली आहे. आपल्या तिसऱ्या लग्नाच्या आड येतो म्हणून एका निर्दयी आईने स्वतःच्या ११ महिन्यांच्या मुलाची निर्घृण हत्या केली. इतकेच नव्हे, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी चिमुरड्याचा मृतदेह दगड बांधून विहिरीत फेकून दिला. याप्रकरणी रांजणगाव पोलिसांनी आरोपी मातेला अटक केली असून, या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

या भीषण प्रकरणाचा उलगडा तेव्हा झाला, जेव्हा तक्रारदार रवींद्र अशोक पवार यांनी ५ एप्रिल रोजी रांजणगाव पोलीस ठाण्यात आपली पत्नी पूजा आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यांनी पोलिसांना सांगितले की, ८ मार्चपासून दोघेही बेपत्ता आहेत. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत पूजा पवार हिचा माग काढला. ती टाकळी हाजी परिसरातील जांबुत गावात मिळून आली. मात्र, जेव्हा पोलिसांनी तिला मुलाबाबत विचारले, तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. तिच्या बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला आणि त्यांनी पोलिसी खाक्या दाखवताच तिने गुन्ह्याची कबुली दिली.

शिरूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत विहिरीतून मुलाचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेह दगड बांधलेल्या अवस्थेत प्लास्टिकच्या पिशवीत सापडला, ज्यामुळे हा नियोजित खून असल्याचे स्पष्ट झाले.

पोलीस उपअधिक्षक प्रशांत ढोले यांनी सांगितले की, “आरोपी महिलेला तिसरे लग्न करायचे होते आणि मूल त्यात अडथळा ठरत होते. याच कारणातून तिने मुलाची हत्या केली. ६ एप्रिल रोजी तिला अटक करण्यात आली असून, ७ एप्रिल रोजी तिला न्यायालयात हजर केले जाईल. तिच्यावर भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.”

एका मातेनेच स्वतःच्या सुखासाठी आपल्या पोटच्या मुलाचा बळी घेतल्याने समाजात संतापाची लाट उसळली आहे. पोलीस आता या प्रकरणातील तांत्रिक पुरावे आणि आरोपीच्या पार्श्वभूमीचा अधिक सखोल तपास करत आहेत.

रागाच्या भरात कृत्य की नियोजनबद्ध कट?

पोलिस चौकशीत समोर आलेली माहिती अंगावर काटा आणणारी आहे. पूजाचे हे दुसरे लग्न होते आणि तिचे पती रवींद्र यांच्याशी सतत भांडणे होत असत. ८ मार्च रोजी हे दाम्पत्य मुरुड येथे फिरायला गेले होते. तिथून परतल्यानंतर पूजाच्या प्रकृतीवरून पती-पत्नीमध्ये जोरदार वाद झाला आणि रवींद्र संतापाने घराबाहेर निघून गेले. याच वेळी ११ महिन्यांचा चिमुरडा सतत रडत होता. आधीच तिसऱ्या लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या पूजाला मुलाचा अडथळा वाटत होता. रडणाऱ्या मुलाच्या आवाजाने तिचा संयम सुटला आणि तिने त्याला सिमेंटच्या ओट्यावर जोरात आपटले. यात त्या निष्पाप बालकाचा जागीच मृत्यू झाला.

दगड बांधून मृतदेह विहिरीत फेकला

मुलाचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच पूजाने पुरावे नष्ट करण्याची तयारी केली. तिने बालकाचा मृतदेह एका कापडी पिशवीत भरला आणि ती पिशवी पाण्यात तरंगू नये म्हणून त्यात जड दगड भरले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास भांबर्डे गावातील एका शेतातील विहिरीत हा मृतदेह फेकून दिला. गुन्हा केल्यानंतर तिने पतीला “मी तुझ्यासोबत राहणार नाही” असे सांगून घर सोडले. विशेष म्हणजे, मुलाच्या हत्येनंतर अवघ्या काही दिवसांतच तिने सोशल मीडियावर एका नवीन पुरुषासोबतचा फोटो पोस्ट करून आपल्या नवीन नात्याची जाहीर वाच्यताही केली होती.

Keep Up to Date with the Most Important News

By pressing the Subscribe button, you confirm that you have read and are agreeing to our Privacy Policy and Terms of Use
Add a comment Add a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous Post

Pune | रक्षक चौकातील उड्डाणपुलाचे होणार सेफ्टी ऑडिट; काम अंतिम टप्प्यात असतानाच सुरक्षा तपासणीचा निर्णय...

Next Post

Pune | एआयच्या मदतीने होणार 'एफआयआर', बाणेर पोलीस ठाण्यात प्रायोगिक तत्त्वावर तंत्रज्ञानाचा वापर...