संग्रहित छायाचित्र
सराफा दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे १५ लाखांचे सोने-चांदी, तसेच हिऱ्यांचे दागिने चोरून नेल्याची घटना १२ ते १३ जूनच्या रात्री घडली. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राजीव रामचंद्र खताळ (वय ३५, रा. कोंढवा खुर्द) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: फिर्यादी यांचे रविवार पेठेत रामलिला ज्वेलर्स नावाचे सराफाचे दुकान आहे. १२ जून रोजी रात्री सव्वा नऊ ते १३ जूनच्या सकाळी साडेसहाच्या दरम्यान दुकान बंद होते. यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या दरवाजाचे कडी-कोयंडा तोडले. दुकानात प्रवेश करून दुकानातील सोने, चांदी तसेच हिऱ्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन चोरटे तिथून पसार झाले. चोरट्यांनी १४ लाख ९५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. हा प्रकार उघडकीस आल्यावर खताळ यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करीत आहेत.
चंदननगरमध्ये घरफोडी
बंद घराचा दरवाजा तोडून बेडरूममधील कपाटातील ११ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची घटना चंदननगर येथील एका रहिवाशी सोसायटीत घडली. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत तुषार राधेश्याम गुप्ता (वय ३१) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार: फिर्यादी हे चंदननगर येथे एका रहिवाशी सोसायटीत राहतात. शुक्रवारी (१३ जून) ते बाहेर गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. अज्ञात आरोपींनी पहाटे एक ते चारच्या दरम्यान घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडले. घरात प्रवेश करून बेडरूममधील लोखंडी कपाट उघडले. कपाटातील सोन्या-चांदीच्या मूर्ती,दागिने तसेच रोख रक्कम असा ११ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
लोहगावमध्ये घरफोडी
बंद घराचा कडी-कोयंडा तोडून घरातून सोन्याचे दागिने, मूर्ती, तसेच रोख रक्कम चोरल्याची घटना लोहगाव भागात घडली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कांता बाळु चौधरी (वय ६२) या महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार: ११ जून ते १३ जून या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या राहत्या घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. घरातील कपाटात ठेवलेले लक्ष्मीमूर्ती, सोन्याचे दागिने, लेडीज घड्याळ तसेच रोख रक्कम असा ४३ हजारांचा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार आदलिंग तपास करीत आहेत.