पुणे: बेकायदा पिस्तूल बाळगल्याबद्दल नदीपात्रात सराईत गुंडाला अटक

बेकायदा पिस्तूल बाळगल्याबद्दल एका गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावर अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अंबाजी कल्याणी शिंगे (वय २४, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Fri, 27 Sep 2024
  • 05:34 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

बेकायदा पिस्तूल बाळगल्याबद्दल एका गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी नदीपात्रातील रस्त्यावर अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त करण्यात आले आहे. अंबाजी कल्याणी शिंगे (वय २४, रा. ससाणेनगर, हडपसर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.

शिंगे याच्याविरुद्ध वानवडी, मुंढवा, हडपसर भागात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शिवाजीनगर पोलिसांचे पथक गस्त घालत असता नदीपात्र परिसरातील नाना-नानी पार्कजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी सचिन जाधव यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंगेला पकडले. त्याची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस आढळले. 

शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक निरीक्षक संजय पांढरे, कैलास दाबेराव, सचिन जाधव, दीपक चव्हाण, अतुल साठे यांनी ही कारवाई केली. शिंगे याने पिस्तूल कोठून आणले, तसेच त्याने पिस्तूल का बाळगले, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे

बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. देशी बनावटीची पिस्तुले मध्य प्रदेशातून आणून त्याची विक्री गुंडांना केली जाते. अनेक गंभीर गुन्ह्यात देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर झाल्याचे आढळले आहे. मध्य प्रदेशातील उमरठी भागात स्थानिक कारागीर देशी बनावटीची पिस्तूल तयार करतात. तेथून महाराष्ट्रात ही पिस्तुले विक्रीस पाठविली जातात. मध्यस्थ सराईतांना पिस्तुलांची विक्री करतात. एका पिस्तुलाची किंमत साधारणपणे २० ते २५ हजार रुपये असते. गुंडांना सहज पिस्तूल उपलब्ध होते. अनेक जण समाजात प्रभाव पाडण्यासाठी पिस्तूल बाळगतात. त्याचे जाहीर प्रदर्शन करून  आपला रुबाब आणि दहशत वाढवण्याचा प्रयत्न करतात.  

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest