PUNE: सीनियर चिफ मॅनेजरकडून पावणेतीन कोटींचा गंडा

पुणे: फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या सीनियर चिफ मॅनेजरने जीएसटी आणि वीजबिल भरण्याच्या नावाखाली सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud News

संग्रहित छायाचित्र

इलेक्ट्रॉनिका फायनान्स कंपनीची बनावट जीएसटी आणि वीजबिलाद्वारे फसवणूक, डेक्कन पोलिसांत गुन्हा दाखल

पुणे: फायनान्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या सीनियर चिफ मॅनेजरने जीएसटी आणि वीजबिल भरण्याच्या नावाखाली सुमारे पावणेतीन कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

रोहित एकनाथ बचुटे असे गुन्हा दाखल झालेल्या सीनियर चिफ मॅनेजरचे नाव आहे. जीएसटी आणि वीजबिल भरण्याच्या नावाखाली वेळोवेळी कंपनीच्या कॅश क्रेडिट खात्याचा वापर करून बचुटे याने २ कोटी ७५ लाख ८४ हजार १५६ रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ६ मे २०२२ ते १० डिसेंबर २०२३ या कालावधीत एरंडवणे येथील इलेक्ट्रॉनिका फायनान्स कंपनीमध्ये घडला. या प्रकरणी कंपनीचे मुख्य अनुपालन अधिकारी (चिफ कंपलायन्स ऑफिसर) महेश पुरुषोत्तम अगरवाल (वय ४७, रा. सृष्टी, डी. पी. रोड, कोथरूड) यांनी फिर्याद दिली होती.

डेक्कन पोलीस ठाण्याचे (Deccan Police Station) वरिष्ठ निरीक्षक विपीन हसबनीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलेक्ट्रॉनिका ही कंपनी लघु आणि मध्यम उद्योगांना मशीन विकत घेण्यासाठी कर्जसाहाय्य उपलब्ध करून देण्याचा व्यवसाय करते. या कंपनीचे कार्यालय एरंडवणे येथील डॉ. केतकर रस्त्यावर आहे. कंपनीच्या भारतभर २०० पेक्षा जास्त शाखा आहेत. अगरवाल यांच्यावर कंपनीचे अकाउंटस, ऑडिट, टॅक्स ह्या विभागांचीदेखील जबाबदारी आहे.

आरोपी रोहित बचुटे या या कंपनीमध्ये सीनियर चिफ मॅनेजर म्हणून मार्च २०२१ पासून कार्यरत आहे. त्याच्याकडे भारतातील सर्व शाखांचे जीएसटी भरण्याची तसेच आरबीआय कंपलायन्स करण्याची जबाबदारी कंपनीने दिलेली आहे. तसेच वीजबिल भरण्याची जबाबदारी अकाउंटस मॅनेजर अमित विजय गुमास्ते तर स्टॅम्पिंग  खर्च करण्याची जबाबदारी ऑपरेशन्स अधिकारी सुरेंद्र फडके यांच्याकडे दिली आहे.  कंपनीचे बँक ऑफ महाराष्ट्रच्या  एफसी रोड शाखेमध्ये कॅश क्रेडिक खाते असून त्यामधून जीएसटी, वीजबिल आणि स्टॅम्पिंगचा खर्च ऑनलाईन ट्रान्झक्शनद्वारे ओटीपी प्रणालीचा वापर करून केला जातो.

कंपनीचे उपाध्यक्ष अक्षय सुदामे यांच्याकडे कंपनीच्या नावाने असलेला मोबाईल आहे. त्यावर ओटीपी आल्यानंतर विविध खात्यांचे अधिकारी हा ओटीपी घेऊन ऑनलाईन ट्रान्झेक्शन करतात. कंपनीचे अकाउंट्स मॅनेजर अमित गुमास्ते यांनी २ जानेवारी २०२४ रोजी डिसेंबर २०२३ चा बँक खात्याचा हिशोब करायला घेतला होता. त्यावेळी त्यांना, बँक स्टेटमेंटमध्ये जीएसटीच्या व्यवहारांमध्ये अनोळखी देयके असल्याचे निदर्शनास आले. गुमास्ते यांनी याबाबत फिर्यादी अगरवाल यांना माहिती कळवली. गुमास्ते आणि सुदामे यांना जीएसटी व इतर व्यवहारांची तपासणी करण्याच्या त्यांनी सूचना केल्या. त्या तपासणीमध्ये एप्रिल २०२२ पासूनचे जीएसटी आणि एप्रिल २०२३ पासूनच्या वीजबिल देयकांमध्ये अनेक ति-हाईत व्यक्ती आणि व्यावसायिक आस्थापनांची वीज बिले तसेच जीएसटी इलक्ट्रॉनिका कंपनीच्या कॅश क्रेडिट खात्यामधून भरल्याचे दिसून आले. खर्चाचे ओटीपी कोणी घेतले याबाबत माहिती घेतली असता बचुटे यानेच वारंवार मोबाईल नेल्याचे समोर आले.

गुमास्ते यांनी जीएसटी व्यवहारांबाबत चौकशी केली असता एक व्यवहार देवरुक ग्लोबलायझेशन प्रा. लि. (विमाननगर) यांच्याकरिता झाल्याचे आणि या कंपनीचे संचालक महादेव येवले असल्याचे समोर आले. येवले हे  बचुटे याचे मित्र असल्याचेदेखील समोर आले. दरम्यान, सुदामे यांनी इतर व्यवहारांची बँक ऑफ महाराष्ट्र, बिल डेस्क आणि एमएसईबी यांच्याकडे ई मेलद्वारे चौकशी केली. तेव्हा वेगळ्याच व्यक्तीच्या नावे वीजबिले भरण्यात आल्याचे निदर्शनास आले. इलेक्ट्रॉनिका कंपनीच्या आयटी विभागाने रोहित बचुटे याच्या संगणक आणि लॅपटॉपची पाहणी केली. त्यामध्ये कंपनीच्या अन्य कर्मचा-यांच्या संगणकप्रणालीमध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून काही व्यवहार केल्याचे आढळले. कंपनीमधील सीसीटीव्हीमध्ये देखील तो अनेकदा संशयास्पद हालचाली करीत असताना दिसला. त्यानेच हा घोटाळा केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कंपनीमार्फत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Share this story

Latest