दोघा आरोपींची ओळख पटवून अटक करून घेतले ताब्यात
पुण्यातील शंकरशेट रोडवरील धोबीघाट येथील स्मशान काली मंदिराजवळ पैशांच्या वादातून एका ५१ वर्षीय रिक्षाचालकावर कोयता आणि पिस्तूलाने निर्घृण हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. फिर्यादी कनिफनाथ विष्णू नायडू (वय ५१, रा. कासेवाडी, भवानी पेठ) हे ३ एप्रिल रोजी त्यांचे दोन पुतणे विल्सन आणि नमन यांच्यासह दर्शनासाठी मंदिरात गेले असताना ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायडू यांच्याच परिचयातील सहा जणांच्या टोळीने त्यांच्यावर हल्ला केला. हे सर्व आरोपी एकाच परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.
याप्रकरणी अतीक (पूर्ण नाव माहीत नाही), अझीम सलीम शेख उर्फ चोर, पीयूष परदेशी, रेहान उर्फ खिम्या, पवन उमपे आणि गौरव गुजर अशी आरोपींची नावे आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी गौरव गणेश गुजर आणि रेहान फिरोज शेख या दोघांना ताब्यात घेतले असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
नायडू यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
पूर्ववैमनस्यातून कट रचून हल्ला
फिर्यादीनुसार, नायडू यांनी आरोपींना दिलेले पैसे परत मागितल्यामुळे हा वाद सुरू झाला होता. नायडू दर शुक्रवारी मंदिरात दर्शनाला जातात, ही बाब आरोपींना ठाऊक होती. त्यामुळे आरोपींनी स्मशानभूमी आणि मंदिर परिसरात आधीच दबा धरून बसले होते. लोखंडी शस्त्रे आणि पिस्तूल घेऊन आलेल्या या टोळीने नायडू यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला. त्यांच्या डोक्यात लोखंडी शस्त्राने वार केल्यामुळे गंभीर दुखापत झाली, तसेच पिस्तूलने त्यांच्या तोंडावर प्रहार करण्यात आला. नायडू जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरूच ठेवली.
पुतण्यांना पिस्तूल दाखवून धमकावले
जेव्हा नायडू यांचे पुतणे विल्सन आणि नमन त्यांना वाचवण्यासाठी पुढे आले, तेव्हा आरोपींनी त्यांच्यावर पिस्तूल रोखून ‘पुढे आलात तर जीवे मारू’ अशी धमकी दिली. तसेच त्यांना शिवीगाळ करत मारहाणही केली. स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत निकम यांनी सांगितले की, ‘हा हल्ला कासेवाडी परिसरात राहणाऱ्या व्यक्तींमधील आर्थिक वादातून झाला आहे. फिर्यादी नियमितपणे मंदिरात जात असत आणि आरोपींना त्यांच्या हालचालींची माहिती होती. प्राथमिक तपासात हा हल्ला अचानक झालेला नसून पूर्वनियोजित असल्याचे दिसून येत आहे.’


