पुणे: काच कारखान्यात मृत्यूचे तांडव; बेल्ट तुटल्याने अवजड काचा अंगावर पडून चार कामगार जागीच ठार
पुणे: सासवड रस्त्यावरील वडकी नाला भागात गादी कारखान्यातील यंत्रात अडकून (फोम मिक्सर मशिन) कामगाराचा मृत्यू झाल्याच्या घटनेला एक महिना झाला. त्यातच पुण्याजवळ येवलेवाडी येथील इंडिया ग्लास सोल्युशन या काचेच्या कारखान्यात काचा उतरवताना रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. या अपघातात चार कामगार बळी पडले असून दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व कामगार उत्तर प्रदेशातील आहेत. काचा ठेवलेल्या लाकडी बॉक्सला बांधलेला बेल्ट तुटल्याने त्या अवजड काचा अंगावर पडल्याने हा भीषण अपघात झाला.
वेगवेगळ्या घटनांत शहरात कामगारांना जीव गमवावा लागत असल्याने कामगारांच्या सुरक्षेसाठी प्रशासन काय पावले उचलते, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत अमित शिवशंकर कुमार (वय २७, रा. धांडेकरनगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बु., कायमचा पत्ता- रायबरेली, उत्तर प्रदेश), विकास सर्जू प्रसाद गौतम (वय २३ वर्षे, रा. धांडेकरनगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बु. पुणे. कायमचा पत्ता- उत्तर प्रदेश), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ वर्षे, रा. धांडेकरनगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बु. पुणे. कायमचा पत्ता- सलोन, रायबरेली उत्तर प्रदेश) असे चौघेजण मृत्युमुखी पडले आहेत. जगतपाल संतराम सरोज (वय ४९ वर्षे, रा. धांडेकरनगर, हॉलीव हॉस्टेल, पहिला माळा, येवलेवाडी कोंढवा बु.) व मोनेश्वर (पूर्ण नाव माहीत नाही) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेतली. या प्रकरणी कोंढवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी कंपनीच्या मालकावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. हा अपघात रविवारी (दि. २९) दुपारी घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येवलेवाडी भागात इंडिया ग्लास सोल्युशन या नावाचा मोठा काचेचा कारखाना आहे. या कारखान्यात काचेवर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर काचा विक्रीसाठी बाजारात आणल्या जातात. प्रक्रियेसाठी विविध भागातून या कारखान्यात काचा येतात. अशाच काचेचा ट्रक रविवारी (दि. २९) कारखान्यावर आला होता. ट्र्कमधील काचा उतरवून घेण्यासाठी १० कामगार एकत्र आले होते. त्यांच्याकडून नियोजनानुसार काचा उतरवण्याचे काम सुरू होते. ट्रकमधून मोठे काचेचे स्लाईड खाली उतरवत असताना काचेच्या स्लाईडला बांधण्यात आलेला बेल्ट तुटल्याने दोन मोठे काचेचे स्लाईड मजुरांच्या अंगावर पडले. यात अंगावरच स्लाईड पडल्याने काचेचे तुकडे अंगात घुसले आणि चार मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर कामगारांवर उपचार सुरू आहेत. भीषण घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने मोठी खळबळ माजली असून, पोलीस हा कारखाना कोणाचा आहे याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पुण्यासह इतर शहरांमध्ये अनेक कामगारांचा रोज जीव जात आहे. कोडग्या प्रशासकीय व्यवस्थेमुळे कामगारांच्या जिवाची पर्वा नसल्याचे अशा घडणाऱ्या घटनांवरून दिसून येत आहे. कामगार कायद्यानुसार खरच कामगारांचे हित साधले जाते का?, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची काळजी घेतली जाते? त्यासाठी प्रशासन नेमके काय करत आहे, असा संतापजनक सवाल आता नागरिक उपस्थित करू लागले आहेत.
पुणे परिसरात कामगार बळी पडण्याच्या वाढत्या घटना
१) जून २०२४ मध्ये पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील आय टी डब्ल्यू कंपनीजवळ पार्किंग भिंत अचानक कोसळली होती. या भिंतीखाली एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला होता. दुसऱ्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
२) जून २०२३ मध्ये मार्केट यार्डातील गेट क्रमांक एक जवळील रेवळसिद्ध हॉटेलमध्ये मध्यरात्री लागलेल्या आगीत पोटमाळ्यावर झोपलेल्या तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला होता. अग्निशमन दलाने हॉटेलचे शटर तोडून तिघांना बाहेर काढले होते. या वेळी दोघे मृतावस्थेत, तर एक कामगार जखमी अवस्थेत होता. जखमीचा उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला होता.
३) नोव्हेंबर २०२२ मध्ये पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरातील एमआयडीसीमधील फियाट कंपनीचं ड्रेनेज साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू झाला होता.
४) ऑक्टोबर २०२२ मध्ये पुण्यातील वाघोलीतील निवासी सोसायटीत नाला साफ करताना तीन कामगारांचा श्वास गुदमरून मृत्यू.
५) फेब्रुवारी २०२२ मध्ये येरवडा परिसरातील शास्त्रीनगर भागात बांधकाम सुरू असलेल्या मॉलचा स्लॅब कोसळून ५ कामगारांचा मृत्यू झाला होता. याच घटनेत ५ कामगार जखमी झाले होते.
६) डिसेंबर २०१७ मध्ये कोथरूड येथील डावी भुसारी कॉलनीत गादी कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत चार ते सहा कामगारांचा होरपळून मृत्यू.
येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात ही दुर्घटना घडली असून चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा पंचनामा केला जात आहे. तसेच या प्रकरणी चौकशी केली जात असून गुन्हा दाखल केला जाणार आहे. कारखान्याच्या मालकाचा शोध घेतला जात असून त्याच्यावरही गुन्हा दाखल केला जाईल.
- विनय पाटणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन.
'सीविक मिरर'चे प्रशासनाला प्रश्न
१) काचेच्या कारखान्याला सरकारी परवानगी आहे का?
२) कारखान्यात काचेचे मोठे बॉक्स येतात, तर ते उतरवून घेण्यासाठी कामगारांच्या सुरक्षिततेसाठी काय काळजी घेतली होती?
३) कामगारांचा जीव घेणाऱ्या कंपनीवर कडक कारवाई करणार का ?
४) पुण्यासारख्या शहरात कामगारांना सातत्याने जीव गमवावा लागत असल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासन काय काळजी घेणार?