संग्रहित छायाचित्र
पुणे : काळ्या पैशांच्या व्यवहाराशी संबंधित डिजिटल अरेस्टच्या कारवाईची भीती दाखवून एका महिलेची १३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना पाषाण भागात घडली आहे. या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
या प्रकरणात एका महिलेने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पाषाण परिसरात राहणाऱ्या आहेत. २ जानेवारी रोजी सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संपर्क साधला आणि त्यांना सांगितले की, मुंबई गुन्हे शाखेकडून काळ्या पैशांच्या प्रकरणात कारवाई करण्यात येणार आहे. महिला यांच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारात झाला आहे, असे चोरट्यांनी तिला सांगितले. महिलेला डिजिटल अरेस्ट होण्याची भीती दाखवून, तिला अटक टाळण्यासाठी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. घाबरून महिलेने १३ लाख २३ हजार रुपये चोरट्यांच्या बँक खात्यात जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यानंतर, तिने पोलिस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगताप यावेळी तपास करत आहेत.