संग्रहित छायाचित्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींना पिस्तूल पुरविणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुन्हे शाखेने केलेल्या तपासात त्याचे नाव समोर आले होते. त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्याला जेरबंद केले. आंदेकर खून प्रकरणात आतापर्यंत २१ आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
अभिषेक उर्फ आबा नारायण खोंड (वय २४, रा. लक्ष्मीगार्डन सोसायटी, देशमुखवाडी, शिवणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आंदेकर यांचा १ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात पिस्तुलातून गोळ्या झाडून, तसेच कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. कौटुंबिक वाद आणि वर्चस्वाच्या वादातून हा खून करण्यात आला होता.
या प्रकरणी यापूर्वी गणेश कोमकर, संजीवनी जयंत कोमकर, जयंत कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, तुषार उर्फ आबा कदम, सागर पवार, पवन करताल, समीर उर्फ सॅम काळे यांच्यासह एकूण २० जणांना अटक करण्यात आलेली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांनी फिर्याद दिलेली आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र संघातीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
या प्रकरणात आंदेकर यांची बहीण संजीवनी कोमकर, मेहुणे जयंत, प्रकाश, गणेश, तसेच गुंड सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते मुख्य सूत्रधार आहेत. गेल्या वर्षी गायकवाडचा मित्र निखिल आखाडेचा आंदेकर टोळीने खून केला होता. आखाडेच्या खुनाचा बदला घेण्याची संधी गायकवाड शोधत होता. आंदेकर यांचा बहीण संजीवनी हिच्याशी वाद झाला होता. वर्चस्व आणि कौटुंबिक वादातून आरोपींनी आंदेकर यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपींकडून पिस्तुले, कोयते, महागडी मोटार, दुचाकी जप्त करण्यात आली होती.
हा खून झाल्यानंतर पोलिसांनी हा खून नेमका कसा झाला आणि कोमकर, सोमनाथ गायकवाड यांचा तसेच अन्य आरोपींचा संपर्क कसा झाला याचा पोलिसांनी तपास सुरू केला होता. त्यावेळी सराईत गुन्हेगार प्रसाद पांडुरंग बेल्हेकर (वय ३३, रा. समाधान चौक, नाना पेठ) हा गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड, तुषार कदम, दूधभाते आणि काळे यांच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या तांत्रिक विश्लेषणात समोर आले. खून झाल्यापासून तो पसार झाला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली होती. तो व गणेश कोमकर हे चांगले परिचयाचे आहेत. त्यांचा एकमेकांशी वेळोवेळी संपर्क होत होता. तसेच, त्यांच्या भेटीही होत होत्या. गणेश कोमकर याने बेल्हेकरच्या माध्यमातून फोनद्वारे दूधभाते व कदम यांच्याशी संपर्क साधला. तसेच, सोमनाथ गायकवाड आणि समीर काळे यांची प्रत्यक्षात भेट घेतली. वनराज यांना ठार मारल्यास जामिनाबाबत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आणि रोख रक्कम देण्याचे आश्वासन गणेश कोमकर याने दिले होते. या सर्वांनी वनराज यांचा खून करण्याचे ठरवले होते.
बेल्हेकरला अटक केल्यानंतर शस्त्र पुरवठा करणाऱ्या खोंड याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्याला सापळा रचून पकडण्यात आले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे, साहाय्यक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, उपनिरीक्षक अविनाश लोहोटे, साहाय्यक फौजदार राहुल मखरे यांनी ही कारवाई केली.