संग्रहित छायाचित्र
पुणे : अल्पवयीन मुलीला फिरायला नेण्याच्या बहाण्याने मांजरी (Manjari) येथील नदीपात्रात नेऊन झुडपामध्ये तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यामध्ये दोघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार २९ जानेवारी रोजी संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ वाजण्याच्या दरम्यान घडला. (Pune Crime News)
अनुराग साळवे (रा. आनंदनगर, केशवनगर, मुंढवा) आणि गणेश म्हेत्रेब (रा. शिंदे वस्ती, मुंढवा) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी १५ वर्षीय अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या दोन मैत्रिणी आहेत. या दोन मैत्रिणींचे आरोपी हे मित्र आहेत. त्यांच्यामार्फत आरोपींची आणि तिची ओळख झाली होती. आरोपींनी या मुलीला फिरायला नेतो असे सांगून मोटरसायकलवर बसवत सोबत नेले. (Latest News Pune)
मांजरी गावातील नदीच्या पुलाच्या अलीकडे असलेल्या नदीपात्राच्या कडेने जाणाऱ्या कच्च्या रस्त्याने या मुलीला नेण्यात आले. कच्च्या रस्त्याने गेल्यानंतर साधारणपणे ५०० मीटर आत असलेल्या एका काटेरी झुडपामध्ये या मुलीला नेण्यात आले. त्या ठिकाणी एकांताचा गैरफायदा घेत आरोपींनी तिच्यावर आळीपाळीने जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर आरोपी या मुलीला तिथे सोडून पळून गेले. दरम्यान, आरोपी अनुराग साळवे हा पहाटेच्या सुमारास परत त्या ठिकाणी गेला. त्यावेळी पीडित मुलगी त्याच ठिकाणी होती. त्याने या मुलीला सोबत घेऊन तिच्या घराबाहेर सोडले आणि तिथून तो पळून गेला.
या संदर्भात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी विचारणा केल्या असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी हडपसर पोलीस (Hadapsar Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे करीत आहेत.