‘कोयता गँग’चे चार गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार
कोयत्याचा धाक दाखवून आणि तोडफोड करून वाघोली भागात दहशत माजवणाऱ्या चार सराईतांना पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले. रोहन ऊर्फ मोन्या रामप्यारे गिरी (वय २०, रा. सुयोगनगर, भावडी रोड, वाघोली), विकास राजू जाधव (वय २०, रा. केसनंद फाटा, वाघोली), आदित्य दीपक कांबळे (वय १८, रा. सिद्धी विनायक पार्क, वाघोली), वैभव सुभाष पोळ (वय १८, रा. बीजीएस फाट्याजवळ, वाघोली) अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी पुणे-अहिल्यानगर रोड, वाघोली, बकोरी फाटा, वाघोली बाजारतळ, तसेच आसपासच्या भागात दहशत माजवणे, गंभीर दुखापत करुन तोडफोड करणे अशा स्वरूपाचे गुन्हे केले आहेत. हे गुंड नागरिकांना कायम दहशतीखाली ठेवून वारंवार त्रास देत होते. त्यामुळे स्थानिक लोक नेहमी दडपणाखाली वावरत होते. या सराईतांवर वचक बसावा या उद्देशाने या उद्देशाने सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे यांनी या गुंडांवर दाखल गुन्ह्यांचे अभिलेख तपासले. त्यानुसार महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्यांना तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव उपायुक्त हिम्मत जाधव यांना पाठवला होता. मिळालेल्या प्रस्तावानुसार उपायुक्त जाधव यांनी या टोळीला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.
कोयत्याचा धाक दाखवून तसेच समाजमाध्यमांचा वापर करून दहशत निर्माण करणार्यांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारच्या कारवाईच्या मोहिमा सातत्याने राबवण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्राजंली सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, पोलीस उपनिरीक्षक दर्शन देवगडे, पोलीस अंमलदार सागर कडु, कमलेश शिंदे, प्रशांत कर्णवर, प्रदिप मोटे, महादेव कुंभार, साई रोकडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, प्रतिम वाघ, गहिनीनाथ बोयणे, समीर बोरडे यांनी केली.