संग्रहित छायाचित्र
फर्निचरचे काम करण्यासाठी तो यापूर्वी अनेकदा पुण्यात येत असे. त्यामुळे त्याला पुण्याची माहिती होती. यावेळी मात्र पुण्यात येताना तो अफू हा अंमली पदार्थ घेऊन आला होता. याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याला पकडून तब्बल २२ लाखाचे १ किलो ९० ग्रॅम अफू जप्त केला आहे.
नाथुराम जीवनराम जाट (वय ५२, रा. असावरी, तेहसील मुंडवा, जि. नागोर, राजस्थान) असे त्याचे नाव आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्याकरीता तसेच अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवुन जास्तीत जास्त अंमली पदार्थ तस्कर यांच्याविरुद्ध माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशाप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे कोंढवा परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी कोंढव्यातील उन्नती धाम सोसायटीच्या बाहेरील रोडवर एक जण हातामध्ये लाल रंगाची ट्रॅव्हल बॅग घेऊन संशयितरित्या उभा होता. पोलिसांना पाहून तो गडबडला. तेव्हा पोलिसांनी त्याचे नाव पत्ता विचारुन चौकशी केली. त्याच्याकडील बॅगची तपासणी केल्यावर त्यात २१ लाख ८० हजार रुपयांचा १ किलो ९० ग्रॅम अफू हा अंमली पदार्थ मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की, फर्निचर बनविण्याच्या कामासाठी तो यापूर्वी पुण्यात आला होता. अल्पवधीत पैसे कमाविण्याच्या इराद्याने अफू विक्रीसाठी पुण्यात आणल्याचे सांगितले.
ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार दयानंद तेलंगे पाटील, संदिप शिर्के, विशाल दळवी, सचिन माळवे, प्रविण उत्तेकर, संदेश काकडे, दत्ताराम जाधव, ज्ञानेश्वर घोरपडे, योगेश मोहिते यांनी केली आहे.