संग्रहित छायाचित्र
पुणे : हडपसर-सासवड रस्त्यावरील उरूळी देवाची परिसरात पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली सापडून एका वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी टँकर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
कृष्णा राहुल महतो (वय १ ) असे मृत बालकाचे नाव आहे. याप्रकरणी टँकरचालक विजयकुमार बालाजी फड (वय ३२, रा. खांदवेनगर, लोहगाव) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी बालकाची आई बबीतादेवी राहुल महतो (वय २२, सध्या रा. उरुळी देवाची, हडपसर-सासवड रस्ता, फुरसुंगी) यांनी हडपसर (काळेपडळ) पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महतो दाम्पत्य उरुळी देवाची परिसरातील एका भंगार दुकानात कामाला आहे. याच दुकानाच्या पोटमाळ्यावर ते वास्तव्यास आहेत. मंगळवारी (२१ जानेवारी) दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मुलगा कृष्णा दुकानासमोरील मोकळ्या जागेत खेळत होता. आईने त्याला चटईवर ठेवले होते. त्याचवेळी पाण्याचा टँकर आला आणि कृष्णा त्याच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावर न थांबता पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे पुढील तपास करत आहेत.