पुणे : पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने कारवाई करत बिबवेवाडी आणि कोंढवा भागातून २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. बिबवेवाडी भागातून ११ लाखांचे मेफेड्रोन तर कोंढवा येथून १५ लाखांचे अफू जप्त करण्यात आले. अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कोंढवा येथून अटक केली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने बिबवेवाडी भागात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी एकाकडून ११ लाखांचे मेफेड्रोन जप्त केले. विठ्ठल ऊर्फ अण्णा रघुनाथ कराडे (वय ५७, रा. बिबवेवाडी) याच्याकडे मेफेड्रोन असल्याची माहिती आझीम शेख यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून ११ लाख २ हजार रुपयांचे मेफेड्रोन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, मोबाईल असा ११ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, अमली पदार्थ विरोधी विभागाचे पथक कोंढवा भागात गस्त घालत होते. त्या वेळी भैरवनाथ मंदिराजवळ एक जण थांबला असून, त्याच्याकडे अफू असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी सचिन माळवे यांना मिळाली. त्यानंतर सापळा लावून पोलिसंनी भागीरथराम रामलाल बिष्णोई (वय ४६, रा. टिळेकरनगर, कोंढवा) याला पकडले. त्याच्याकडून १४ लाख ९८ हजार रुपयांची अफू, पिशवी, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा १५ लाख चार हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बिष्णोई याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली.
गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे, राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस कर्मचारी योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, नितीन जगदाळे, युवराज कांबळे, दिनेश बास्टेबाड यांनी ही कामगिरी केली.
बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्री करणारा गजाआड
बुधवार पेठेत मेफेड्रोन विक्री करणाऱ्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, रोख रक्कम असा एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संदीप सुकनराज जैन (वय ४२, रा. भुलेश्वर, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंध कायद्यान्वये फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेत पोलिसांचे पथक शनिवारी दुपारी गस्त घालत होते. त्या वेळी परिसरातील एका पानपट्टीजवळ जैन थांबला होता. त्याच्याकडे मेफेड्रोन असल्याची मााहिती पोलीस कर्मचारी प्रशांत पालांडे यांना मिळाली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जैन याला पकडले. त्याच्याकडून दोन ग्रॅम २४ मिलिग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल, तसेच पाच हजार ६२० रुपये असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मेफेड्रोनची किंमत ४५ हजार रुपये आहे. जैन याने मेफेड्रोन कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. जैन याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.