सग्रहीत छायाचित्र
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एकाची १९ लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध समर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत अभिजीत विष्णुकांत गावडे (वय ४५, रा. सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार गावडे सोमवार पेठेत राहायला आहेत. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला . शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे प्रलोभन चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. सायबर चोरट्यांनी सांगितल्यानुसार गावडे यांनी खात्यात रकम जमा केली. सुरुवातीला चोरट्यांनी त्यांना परतावा दिला. त्यानंतर गेल्या महिनाभरात गावडे यांनी चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी १९ लाख रुपये जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना परतावा देणे बंद केले. दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गावडे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करत आहेत.