पुणे: कोरेगांव पार्क भागात माजी लष्करी अधिकाऱ्यासह चार ते पाच जणांची गुंतवणुकीवर ३० टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून तब्बल १० कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मनिष केदारनाथ सुरवसे (वय ४८, रा. बी. टी. कवडे रस्ता) यांनी कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रफुल्ल जैन उर्फ प्रमोद प्रकाश माहेश्वरी, सोनिया माहेश्वरी, गौरव उर्फ गर्वित प्रमोद माहेश्वरी, हर्ष माहेश्वरी (सर्व रा. नेलर रस्ता), देविसिंग पुरोहित , संकेत मुतगेकर (दोघेही रा. धानोरी), सोनिया उर्फ कशिश जोधानी, पंकज पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या, फिर्यादी सुरवसे हे माजी लष्करी अधिकारी आहेत. एका नातेवाईकाच्या मदतीने त्यांची आरोपींशी सप्टेंबर २०२४ मध्ये ओळख झाली होती. आरोपींनी फिर्यादी तसेच त्यांच्या सहकारी मित्रांना गुंतवणूकीवर ३० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना लर्नोवेशन इंडिया या ट्रेडिंग एज्युकेशन फर्म मध्ये तीन कोटी २५ लाख २८ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यासोबत इतर काही जणांनाही अशाच पद्धतीने मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून आरोपींनी त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आतापर्यंत चार ते पाच जणांची आरोपींनी १० कोटी ४६ लाख ६३ हजार रुपयांची फसवणूक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल थोपटे तपास करीत आहेत.
मुख्य आरोपी फरार
या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार प्रफुल्ल जैन उर्फ प्रमोद प्रकाश माहेश्वरी हा फरार आहे. दरम्यान, इतर आरोपींची गुन्ह्यातील भूमिका स्पष्ट करून त्यांच्यावर पुढील कारवाई केली जाईल. आता पर्यंत चार ते पाच जणांची फसवणूक झाल्याचे समोर आले. मात्र याप्रकरणात फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक थोपटे यांनी दिली.