संग्रहित छायाचित्र
पुणे: दिवसागणिक ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. कधी शेअर बाजारातील गुंतवणुकीवरील परताव्याचे आमिष, तर कधी टास्क फ्रॉड, कधी एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याची बतावणी तर कधी ड्रग्ज पकडले गेल्याचे फोन कॉलद्वारे घातला जाणारा गंडा... अशा अनेक घटनांमध्ये पुणेकरांचे कोट्यवधी रुपये लंपास केले जात आहेत. अशाच काही घटना समोर आल्या असून त्यात पाचजणांची तब्बल एक कोटी ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
एका तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाला सायबर चोरट्यांनी फोन केला. त्यांनी एसबीआय सिक्युरिटीज स्टॉक कंपनीचे एजंट असल्याची बतावणी केली. त्यांनी या तरुणाला एसबीआय सर्व्हिस ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यांना एक लिंक पाठवण्यात आली. त्यांना एसबीआय सिक्युरिटीजचे मोबाइल ॲप डाऊनलोड करायला लावले. मोठ्या कंपन्याचे शेअर आणि आयपीओ खरेदी आणि विक्री केल्यानंतर अधिक नफा मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. आरोपींनी सुरुवातीला तक्रारदाराला तीस हजार रुपये नफा झाल्याचे सांगून त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले. त्यानंतर अनेक कारणे सांगून त्यांनी तक्रारदाराला विविध बँक खात्यांवर पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणाची ९४ लाख ८२ हजार ८०४ रुपयांची फसवणूक करण्यात आली. या तरुणाने सायबर पोलिसांकडे दाखल केली आहे. हा प्रकार १७ जुलै ते ९ सप्टेंबर या काळात घडला.
शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास मोठा परतावा मिळेल असे सांगत एका ४३ वर्षीय व्यक्तीला १० मे ते २६ जुलै २०२४ या काळात ७७ लाख ५० हजार ७५४ रुपयांना ठगवण्यात आले. फिर्यादी वडगाव बुद्रुक येथील मीनाक्षी पूरम सोसायटीमध्ये राहण्यास आहेत. त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सायबर चोरट्यांनी फिर्यादीला शेअर बाजारात ट्रेडिंगद्वारे चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यांना मोबाइलमध्ये एक ॲप डाउनलोड करण्यास सांगत विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले. गुंतवलेली रक्कम आणि परतावा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दाखल केली.
यासोबतच फेसबुकवर ट्रेडिंगसंदर्भातील एक जाहिरात पाहून तरुणाची फसगत झाल्याचे समोर आले आहे. अधिकाधिक नफा मिळवून देण्याची बतावणी करीत १२ लाख रुपयांना गंडवण्यात आले आहे. या तरुणाला आरोपींनी व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर त्यांना ट्रेडिंग टास्क देण्यात आला. त्यात पैसे गुंतवण्यास भाग पाडले. मात्र, पैसे गुंतवल्यानंतरही कोणत्याही प्रकारचा परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.
नफ्याच्या मोहाने तरुणी फसली
ट्रेडिंगमध्ये अधिक नफा मिळवून देतो, असे सांगून सायबर चोरट्यांनी एका तरुणीची २४ लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी लोहगाव परिसरात राहणार्या २९ वर्षीय तरुणीने विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. सायबर चोरट्यांनी तरुणीला ऑनलाइन लिंक पाठवून ॲप डाउनलोड करण्यास सांगितले. तरुणीने त्यात पैसे गुंतवले. त्यानंतर भरघोस नफा मिळत असल्याचे भासवून, ते पैसे काढण्यासाठी शुल्क लागेल, असे सांगून तरुणीला विविध बँक खात्यात पैसे पाठविण्यास भाग पाडले.
कॅश बॅकचे आमिष
क्रेडिट कार्ड कॅश बॅकच्या आमिषाने तरुणीची १७ लाख १० हजारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी एरंडवणे भागात राहणार्या २६ वर्षीय तरुणीने अलंकार पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना १० ते ११ एप्रिल २०२४ या दरम्यान घडली. सायबर चोरट्याने तरुणीला बँकेचा प्रतिनिधी बोलत असून क्रेडिट कार्ड कॅश बॅक देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.