Crime News
पुणे: प्रेमविवाह केल्यानंतर कोथरूड येथे वास्तव्यास असलेले दाम्पत्य कुटुंबातील लग्न सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये गेले होते. त्यावेळी हळदी कार्यक्रमात घुसून निवृत्त जवानाने पोटच्या मुलीवर आणि जावयावर बेछूट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दुर्दैवाने या गोळीबारात मुलीचा जागेवरच मृत्यू झाला असून जावई गंभीर जखमी झाला आहे.
तृप्ती अविनाश वाघ (वय २४) असे मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर तिचा नवरा अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोघे मूळचे करवंद, शिरपूर, सध्या राहणार कोथरूड, पुणे) हा या गोळीबारात जखमी झाला आहे. याप्रकरणी किरण मंगळे (वय ४८, रा.शिरपूर) आणि त्याचा मुलगा निखिल मंगळे या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अविनाश वाघ यांची आई प्रियंका वाघ यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश वाघ याच्याशी प्रेमविवाह केला होता. सीआरपीएफचे निवृत्त जवान असलेले वडील किरण अर्जुन मंगळे याला हा विवाह पसंत नव्हता. दरम्यान, अविनाश त्याच्या बहिणीच्या विवाह समारंभासाठी तृप्तीसह शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळी चोपडा येथे आला होता. बहिणीच्या हळदीसाठी जावई लेकीसह चोपडा येथे आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली. हळद सुरू असलेल्या ठिकाणी पोहचून मंगळे याने परवाना असलेल्या पिस्तुलातून गोळी झाडून लेक तृप्तीचा खून केला. तर जावई अविनाश याच्या पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही संतापजनक घटना चोपडा शहरातील डॉ. आंबेडकर नगर परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर संतप्त लोकांनी गोळी झाडणाऱ्या किरण मंगळे याला मारहाण केली. या मारहाणीत तोही गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत.