संग्रहित छायाचित्र
पुण्यात बनावट लष्कर भरतीचे रॅकेट उघडकीस आले आहे. लष्करात नोकरी देण्याच्या बहाण्याने दोन तरुणांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दक्षिण कमांडच्या मिलिटरी इंटेलिजन्स आणि बंडगार्डन पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एकाला पुणे रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
मोहीत रामसिंग धामी (रा. उत्तराखंड) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी रविंद्र जनार्दन बिलाडे (वय २३, रा. बोरकुल, धुळे) या तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१९ (२) आणि कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार रविंद्र बिलाडे हा तरुण सरकारी नोकरीसाठी सैन्य भरतीची तयारी करत आहे. त्याने बी.एस्सी केमिस्ट्रीपर्यंत शिक्षण घेतले असून तो आपल्या आई-वडिलांसोबत गावी राहतो. त्याच्याच गावातील मित्र दीपक विजय रोकडे हा देखील लष्करात भरती होण्यासाठी रविंद्रसोबत अभ्यास करायचा.
मागील वर्षी ३१ मार्च रोजी रविंद्र आणि दीपक पुण्यात स्टाफ सिलेक्शनच्या भरतीसाठी आले होते. परीक्षा दिल्यानंतर गावी परत जाण्यासाठी ते पुणे रेल्वे स्थानकावर गेले. रात्री ८ वाजण्याच्या सुमारास आरोपी मोहीत धामी रेल्वे स्थानकावर आला आणि त्यांची भेट झाली. धामीने तो लष्करात असून सध्या कमांड हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे असे सांगितले आणि दोघांशी संवाद सुरू केला. गप्पांच्या ओघात "मी तुम्हाला लष्करात भरती करून देऊ शकतो" असे आमिष दोघांना दाखवले. त्यावर रविंद्र आणि दीपकने त्यांचे वय जास्त असल्याचे सांगितले. मात्र,'वय जास्त असले तरी मी तुमचे काम करून देतो' अशी बतावणी धामीने केली. त्यानंतर त्याने त्यांचे मोबाईल क्रमांक घेतले.
त्यानंतर ३ एप्रिल रोजी आरोपीने रविंद्र आणि दीपक यांना फोन करून त्यांची कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर मागवली. सोबतच एक क्युआर कोड पाठवून प्रत्येकी ५ हजार असे १० हजार रुपये ऑनलाईन मागितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून, वेगवेगळ्या क्युआर कोडवर आणि वेगवेगळ्या फोन नंबरवर ऑनलाइन पैसे मागितले. अशा प्रकारे आरोपीने रविंद्रकडून २.८० लाख रुपये आणि दीपककडून २ लाख रुपये उकळले.
काही दिवसांनी आरोपीने त्यांचे फोन उचलणे टाळले. नोव्हेंबर महिन्यापासून त्याचा फोन बंद लागू लागला. त्यानंतर दोघांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी मोहीत धामीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मिळून आला नाही. अखेर, रविंद्रने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
संयुक्त कारवाईत आरोपीला अटक
पुण्यातील दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्स आणि बंडगार्डन पोलिसांच्या संयुक्त कारवाईत, मंगळवारी (११ फेब्रुवारी) सायंकाळी ८.३० वाजता आरोपी मोहीत रामसिंग धामी याला पुणे रेल्वे स्थानकाजवळ ताब्यात घेतले. मिलिटरी इंटेलिजन्सने दिलेल्या माहितीनुसार, धामी बनावट लष्कर भरतीचे रॅकेट चालवत होता. त्याने उत्तराखंड, पंजाब आणि महाराष्ट्रातील गरीब, होतकरू तरुणांना सैन्यात भरती करून देण्याचे आमिष दाखवून फसवले. प्रत्येक उमेदवाराकडून तो २ लाख रुपये घेत असे. सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात आरोपीची चौकशी सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.