नामांकित ‘ॲपल’ कंपनीचे अधिकृत वितरक असल्याचे भासवून पुण्यातील एका मोबाईल व्यावसायिकाची पाच कोटी ५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चेन्नईतील तीन बड्या कंपन्यांच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणी पिंपळे निलख येथील विशालनगर परिसरात राहणारे आणि मोबाईल विक्री व्यवसाय करणारे निखिल अरुण सरगे (वय ४२) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीच्या आधारे रफी सैत (संचालक, सर्फ कम्युनिकेशन प्रा. लि.), शबीर सैत (संचालक, सर्फ कम्युनिकेशन प्रा. लि.) आणि विश्वनाथ मुरुगप्पन (संचालक, टी.व्ही. कॉर्प सोल्यूशन प्रा. लि.) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तिन्ही आरोपी मूळचे चेन्नई येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एप्रिल २०२४ पासून ते आतापर्यंत शिवाजीनगर येथील व्हेरोनिक्स ग्लोबल कंपनीच्या कार्यालयात हा कथित फसवणुकीचा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी पडोळे यांनी सांगितले की, आरोपींनी स्वतःला ॲपलचे अधिकृत वितरक असल्याचे भासवून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला आणि मोठ्या आर्थिक व्यवहारांतून फसवणूक केली. सध्या आर्थिक व्यवहारांची पडताळणी करण्यात येत असून आरोपींच्या हालचालींचाही मागोवा घेतला जात आहे.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे आणि या प्रकरणाशी संबंधित पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपींचा अॅपल उत्पादने विक्रीसाठीचा इन्ग्राम कोड असल्याचा दावा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ॲपल कंपनीची उत्पादने अधिकृतपणे वितरित करण्यासाठी इन्ग्राम कोड असणे आवश्यक असते. हा कोड असलेल्या अधिकृत वितरकांनाच ॲपलची उत्पादने पुरवठा करण्याचा अधिकार असतो. आरोपींनी स्वतःकडे वैध इन्ग्राम कोड असल्याचा खोटा दावा करून तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. सुरुवातीला त्यांनी इतर विक्रेत्यांकडून ॲपल मोबाईल फोन आणि ॲक्सेसरीज खरेदी करून काही प्रमाणात तक्रारदाराला पुरवठा केला. त्यामुळे तक्रारदाराला त्यांच्यावर विश्वास बसला.
मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यासाठी केले प्रवृत्त
यानंतर आरोपींनी तक्रारदार निखिल सरगे यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर देण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांनी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार करून पैसे स्वीकारले. मात्र, त्यापैकी काही माल पुरवण्यात आला असला तरी पाच कोटी ५२ लाख ८२ हजार ५६२ रुपयांचा माल तक्रारदाराला देण्यात आला नाही. पुढे चौकशी केली असता आरोपींकडे कोणताही वैध इन्ग्राम कोड किंवा ॲपल कंपनीची अधिकृत परवानगी नसल्याचे उघड झाले.
कारवाई टाळण्यासाठी दिले पुढील तारखेचे धनादेश
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने आरोपींकडे पैसे परत मागितले. मात्र, आरोपींनी विविध कारणे देत वेळ काढण्याचा प्रयत्न केला आणि पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. इतकेच नव्हे, तर त्यांनी तक्रारदाराला त्यांच्या कंपनीच्या लेटरहेडवर एक साधा करार करण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आरोपींनी पोस्ट-डेटेड धनादेश दिले, परंतु ते जमा करू नयेत अशी विनंतीही नंतर केली. विविध सबबी सांगत त्यांनी पैसे परत न करता रक्कम अपहार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


