पिंपरी-चिंचवड : तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला हिंजवडी पोलिसांनी बावधन येथून अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५) रात्री करण्यात आली.

Pimpri Chinchwad Crime

संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुंडाला हिंजवडी पोलिसांनी बावधन येथून अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २५) रात्री करण्यात आली. अर्जुन ज्ञानदेव मडके (वय २३, रा. भूगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार ओमप्रकाश कांबळे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अर्जुन मडके याला चालू वर्षी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. त्याचा तडीपारीचा कालावधी संपण्यापूर्वी तो शहरात आला. तसेच त्याने स्वतःकडे शस्त्र बाळगले. याबाबत माहिती मिळाल्यानंतर हिंजवडी पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडून कोयता हे शस्त्र जप्त केले आहे.

यमुनानगरमध्ये एकाची आत्महत्या

यमुनानगरमध्ये बजाज ऑटो रोडवर श्रीराम चौकात रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २७) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. बजाज ऑटो कंपनीच्या सीमा भिंतीला लागून असलेल्या झाडाला एका व्यक्तीने फायबर ऑप्टिकल वायरला रुमालाच्या साहाय्याने गळ्याला गाठ मारून आत्महत्या केली. 

घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अग्निशामक विभागाला प्राचारण केले. त्यानुसार प्राधिकरण उप अग्निशामक विभागाचे अग्निशामक अधिकारी गौतम इंगवले, प्रमुख अग्निशामक विमोचक संपत गौंड, संजय महाडिक, फायरमन अनिल माने, वाहनचालक राजेश साखळे, ट्रेनी फायरमन गौरव सुरवसे, तेजस पवार, राकेश महामुलकर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. 

अग्निशामक दलाच्या जवानांनी मृतदेह खाली घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. पवळे उड्डाण पुलाकडून दुर्गानगरकडे जाणारा रस्ता रहदारीचा आहे. 

दिवस-रात्र या मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. रात्रीच्या वेळी घडलेल्या या घटनेकडे कोणाचेही लक्ष न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे हा प्रकार संबंधित व्यक्तीने झाडावर चढून उंच 

ठिकाणी केला असल्याने तिथे अंधारात सहज कुणाचे लक्ष जाणे कठीण असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेने एकाचा मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत पायी चालत जाणाऱ्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि. २५) दुपारी सावरदरी, खेड गावच्या हद्दीमध्ये झाला. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे. किरण रवींद्र साळुंखे (वय ३०) यांनी या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वाहनचालक तिलकराम रामलाल यादव (वय ३८, रा. कळंबोली) याला अटक केली आहे. मयत इसमाची ओळख पटली नसून त्याचे वय अंदाजे ३६ ते ३८ वर्षे आहे. एक व्यक्ती पायी चालत एचपी चौक रोडने जात असताना लिक्विड चौकाकडून भरधाव एक वाहन आले. त्या वाहनाने पादचारी व्यक्तीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा मृत्यू झाला. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest