संग्रहित छायाचित्र
कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीसोबत पोर्शे कारमध्ये असलेल्या ड्रायव्हरचा मोबाईल फोन सुरेंद्रकुमार अगरवाल आणि विशाल अगरवाल यांनी धमकावून काढून घेतला, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी (दि. २५) न्यायालयात दिली.
सुरेंद्रकुमार अगरवाल याला शनिवारी सुटीच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरून फिर्यादी ड्रायव्हर यांचे कपडे आरोपीच्या राहत्या घरातून हस्तगत करण्यात आले आहे. आरोपीचा या गुन्ह्यात प्रत्यक्ष सहभाग निष्पन्न झाला असून त्या अनुषंगाने सविस्तर तपास करून पुरावा हस्तगत करायचा आहे. तसेच फिर्यादी यांचे अपहरण करण्यासाठी आरोपींनी बीएमडब्ल्यू गाडीचा वापर केला असून ती गाडी शोधून जप्त करायची आहे. त्यामुळे आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद बी. एच. डांगळे यांनी केला.
आरोपीच्या वतीने ॲड. प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद करत पोलीस कोठडीस विरोध केला. ‘‘अपघाताच्या दिवशी अगरवाल हे पुण्यात नव्हते. आतापर्यंतच्या सर्व पोलीस तपासास त्यांनी सहकार्य केले असून ते परत आल्यानंतर पुण्यातच आहे.
त्यांना अटक करताना अटकेची चेक लिस्ट पाळण्यात आलेली नाही. अपघातानंतर स्वतःच्या जिवाचे काही बरे-वार्इट व्हायला नको म्हणून फिर्यादी अगरवाल यांच्या बंगल्यात असलेल्या नोकरांच्या रुममध्ये थांबले होते,’’ असा युक्तिवाद ॲड. पाटील यांनी केला. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. बर्डे यांनी अगरवाल याला २८ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा एकमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील करत आहेत.
मी दिल्लीत होतो : सुरेंद्रकुमार अगरवाल
सुरेंद्रकुमार अगरवाल याला शनिवारी दुपारी (ता. २५) न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने त्याला पोलिसांच्या विरोधात काही तक्रार आहे का, असे विचारले. त्यावर त्याने न्यायालयास सांगितले की, ‘‘अपघात घडला तेव्हा मी पत्नीसोबत दिल्लीत होतो. त्यामुळे या सर्व प्रकाराची मला काही माहिती नाही. यात माझा कोणताही सहभाग नव्हता.’’
सुरेंद्रकुमार अगरवाल याच्यावर पूर्वी चार गंभीर गुन्हे
सुरेंद्रकुमार अगरवाल याच्यावर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, फसवणूक यासह विविध कलमांनुसार चार गुन्हे दाखल आहेत. कोंढवा पोलीस ठाण्यात दोन, महाबळेश्वर आणि बंडगार्डन येथे त्याच्यावर प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे. त्याबाबतची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली.