संग्रहित छायाचित्र
बिहार राज्यातून येऊन देहूरोडमध्ये प्रेयसीच्या मित्राची हत्या केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. १९ वर्षीय आरोपी सनी सिंग राजपूत आणि १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे बिहारमधील गावात असल्यापासूनचे प्रेमसंबंध होते. पण, काही कारणामुळे १६ वर्षीय प्रेयसीचे कुटुंब देहूरोड येथे आले. ती शाळेत शिक्षण घेत होती. सनी हा तिच्या संपर्कात होता. प्रेमसंबंध असल्याने त्यांचे नेहमीच फोनवर बोलणे व्हायचे.
अशातच १६ वर्षीय अल्पवयीन प्रेयसीचे हत्या झालेल्या दिलीप मौर्यासोबत सुत जुळले. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. याबाबत प्रेयसीच्या बोलण्यातून आरोपी प्रियकर सनी राजपूतला कुणकुण लागली. प्रेयसीकडून त्याचा मोबाईल नंबर घेतला. त्यांचे फोनद्वारे अनेकदा बोलणे झाले. प्रेयसीला सोडण्यावरून सनी आणि दिलीप यांच्यात वादही झाले. सनीने दिलीप मौर्याला धमकी दिली. अखेर ११ जून रोजी बिहारमधून सनी राजपूत आला. त्याने प्रेयसीचा मित्र दिलीपला फोनद्वारे संपर्क केला. आपण भेटून हे सर्व प्रकरण मिटवू असे त्याला पटवून सांगितले. दिलीपनेही होकार दिला. सनीने दिलीपला रात्री दहाच्या सुमारास देहूरोड येथील मोकळ्या पटांगणात बोलावले. दिलीपने सोबत चुलतभाऊ अरुण मौर्याला घेतले. दोघे सनीला भेटायला गेले. काही मिनिटे त्यांच्यात प्रेयसीवरून शाब्दिक वाद झाले. तेवढ्यात तयारीत आलेल्या सनी राजपूतने थेट दिलीप मौर्याच्या गळ्यावर चाकूने सपासप वार केले. हे बघून चुलतभाऊ मध्ये पडला. सनीने अरुण मौर्याच्या छातीत चाकू भोकसला. घटनास्थळावरून आरोपी प्रियकर सनी तिथून पसार झाला. दोघे ही रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.
काही मिनिटांनी याबाबत पोलिसांना माहिती मिळताच दोघांना रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. पण दिलीप गंभीर जखमी होऊन मृत्यू झालेला होता. अरुणवर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना केली. आरोपी सनी हा गुजरातला गेल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गुजरातमधील बडोदा गाठले. तिथे असलेल्या ३० ते ४० कंपन्या पिंजून काढल्या. पैकी एका कंपनीत सनी हा लपून बसला होता. त्याला तिथून अटक करण्यात आली. ही कारवाई देहूरोड पोलिसांनी केली आहे.