मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...

आई-वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. नवसाने झालेल्या मुलाने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे आई-वडिलांना मुलाविरुद्ध थेट न्यायालयाची पायरी चढावी लागली.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

मुलाने सांभाळण्यास नकार दिल्यावर कोर्टात गेलेल्या आई-वडिलांना पोटगी देण्याचा मिळाला आदेश; मात्र मानसिक ताणतणाव आणि दगदग झाल्याने आईचा हृदयविकाराने मृत्यू, वडिलांना ब्रेन हॅमरेज

आई-वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. नवसाने झालेल्या मुलाने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे आई-वडिलांना मुलाविरुद्ध थेट न्यायालयाची पायरी चढावी लागली. न्यायालयाने आई-वडिलांना दैनंदिन खर्चासाठी पैसे देण्याचा आदेशही दिला. मात्र, या प्रकरणामुळे आलेला मानसिक ताणतणाव आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान झालेली दगदग यामुळे खचलेल्या आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर, वडिलांना ‘ब्रेन हॅमरेज’ झाले.

कोणत्याही संवेदनशील माणसाच्या काळजाला पीळ पाडणाऱ्या या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे.  अॅड. जान्हवी भोसले यांनी या खटल्याबाबत ‘सीविक मिरर’ला सविस्तर माहिती दिली. तीन मुलींनंतर नवससायास करून आईवडिलांना चौथा मुलगा झाला. त्याला लहानाचे मोठे केले. पुण्यात एका खाजगी कंपनीत मुलगा नोकरीस लागला. वडील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. त्यांना १,३०० रुपये पेन्शन आहे. मुलाचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर सासू-सूनेचे न पटल्यामुळे मुलगा आपल्या पत्नीसोबत वेगळा राहण्यास गेला. त्याने एक घर घेतले. मात्र पेन्शनमध्ये आई-वडिलांचे भागत नव्हते. मुलाने  दैनंदिन खर्चासाठी काही रक्कम द्यावी, अशी आईवडिलांची माफक अपेक्षा होती. मात्र, मुलाने आर्थिक मदत करण्यास नकार दिला.

आई-वडील दोघेही आजारी होते. त्यांनी घर विकण्याचे ठरवले. मात्र मुलाने घरावर कर्ज काढले होते. हे कर्ज भरावे, म्हणजे घर विकून येणाऱ्या पैशात छोटे घर विकत घेता येईल आणि उर्वरित पैशात दैनंदिन खर्च भागवता येईल, असे आई-वडिलांनी सांगितले. मात्र मुलाने त्यालादेखील नकार दिला. त्यामुळे आई-वडिलांना न्यायालयात जाण्यावाचून पर्याय उरला नव्हता.

न्यायालयाने पोटगीचा आदेश दिला असला तरी पोटच्या मुलानेच सांभाळण्यास नकार दिल्यामुळे आलेला मानसिक ताणतणाव आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान झालेली दगदग याचा ताण असह्य झाल्यामुळे आईचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यानंतर  वडील ब्रेन हॅमरेज झाल्याने आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. आता, त्यांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न निर्माण झाल्याची माहिती अॅड. जान्हवी भोसले यांनी दिली.

खर्च अधिक असल्याने मदत देण्यास नकार

मुलगा एका खाजगी कंपनीत  नोकरीस आहे. त्याला ६० हजार पगार आहे. त्याची पत्नीदेखील कमावती आहे. आपल्यावर पत्नीची जबाबदारी आहे. घर, गाडी यांच्या कर्जाचे हप्ते असल्याने आपल्याला महिना ५८ हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आई-वडिलांना कोणतीही आर्थिक मदत करण्यास मुलाने नकार दिला. कालांतराने मुलगा आई-वडिलांच्या घरखर्चासाठी पाच हजार पुरेसे आहेत, असे म्हणत ३७०० रुपये देण्यास तयार झाला. पेन्शनची रक्कम त्यात टाकून आईवडिलांचा खर्च भागेल, असा त्याचा युक्तीवाद होता.

न्यायालयाचा निकाल

या प्रकरणी न्यायालयाने एका वर्षात निकाल दिला. आई-वडिलांच्या बाजूने अॅड. जान्हवी भोसले आणि अॅड. भालचंद्र धापटे यांनी युक्तीवाद केला. मुलाने आई-वडिलांना प्रत्येकी आठ हजार रुपये पोटगी द्यावी, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

Share this story

Latest