प्रातिनिधिक छायाचित्र...
पुणे : भविष्य सांगून जीवनातील अडीअडचणी दूर करण्याची बतावणी करून तरुणाच्या बोटातील ६० हजारांची सोन्याची अंगठी लांबविण्यात आल्याची घटना नारायण पेठेत घडली. याप्रकरणी एका चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अभिषेक राठोड (वय ३४, रामबाग कॉलनी, कोथरूड) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण पेठेतील श्री माणकेश्वर विष्णू मंदिराच्या परिसरात चोरटा थांबला होता. तक्रारदार तरुण कोथरूडमधील रामबाग कॉलनीत राहायला आहे. तेथून जात असलेल्या तरुणाने चोरट्याला पाहिले. चोरटा तेथून जाणाऱ्या नागरिकांकडे भविष्य सांगण्याची बतावणी करत होता. तक्रारदार तरुण चोरट्याजवळ गेला. चोरट्याने त्याला जीवनात येणाऱ्या अडीअडचणी दूर करतो, तसेच भविष्य सांगण्याची बतावणी केली. त्यानंतर चोरट्याने तरुणाला बोटातील अंगठी दाखविण्यास सांगितले. चोरट्याने त्याच्या बोटातील अंगठी काढून देण्यास सांगितले. चोरट्याने बोटातील अंगठी काढल्यानंतर ती तोंडात टाकण्याचा बहाणा केला. तरुणाने त्याला अंगठी परत मागितली. अंगठी तुझ्या घरी कागदात गुंडाळून येईल, अशी बतावणी केले.
त्यानंतर चोरटा तेथून पसार झाला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करत आहेत.