प्रातिनिधिक छायाचित्र...
पुणे : सराफा व्यावसायिकांना दागिने घडवून देणाऱ्या कारागिराला चोरट्यांनी लुटले. चोरट्यांनी कारागिरासोबत झटापट केली आणि त्याच्याकडून् तीन लाख रुपयांची सोन्याची तार चोरून नेली. रविवार पेठेत ही घटना घडली. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत भरत देवाराम मिना (वय १८, सध्या रा. लक्ष्मी डायिंग कटींग शॉप, रविवार पेठ) याने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन चोरट्यांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार, फिर्यादी मिना हा एक कारागीर आहे. रविवार पेठेत सराफी पेढींना दागिने बनवून देणारे व्यावसायिक आहेत. त्यांच्याकडे मिना काम करतो. शनिवारी (२६ एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास मिना रविवार पेठेतून सायकलवरून जात होता. त्यावेळी त्याच्याकडे तीन लाख २२ हजार रुपयांची सोन्याची बारीक तार होती.
कमल मंडल यांना ही तार देण्यासाठी तो निघाला होता. चोरट्यांनी त्याला मोती चौक परिसरातील पावटेकर ब्रदर्स अँड सन्स या सराफी पेढीसमोर अडविले. चोरट्यांनी त्याच्याशी झटापट केली. त्याच्याकडील सोन्याची तार चोरून चोरटे तिथून पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक हाळे तपास करत आहेत.
बाजीराव रस्त्यावर ज्येष्ठाचा मोबाइल चोरी..
बाजीराव रस्त्यावरून सायकलवरून घरी निघाले जात असताना पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी ज्येष्ठाच्या शर्टाच्या वरच्या खिशात ठेवलेला सहा हजारांचा मोबाईल काढून घेतला. त्यानंतर चोरटे स्वारगेटच्या दिशेने पसार झाले. ही घटना रविवारी (२७ एप्रिल) पहाटे पाचच्या सुमारास शनिपार चौकाजवळ घडली. याबाबत हेमंत गोविंद पुराणिक (वय ६१, रा. तावरे कॉलनी, पर्वती) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तावरे आपल्या मुलाच्या घरून त्यांच्या घरी निघाले होते. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अनोळखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार नलावडे तपास करीत आहेत.