संग्रहित छायाचित्र
केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यासह विविध राज्यांमधील शहरांमध्ये छापेमारी करीत आंतरराज्य बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला. हा एक देशव्यापी घोटाळा असल्याचे समोर आले असून पाच संशयित व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. या रॅकेटद्वारे विदेशी नागरिक आणि विशेषत: अमेरिकेमधील नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सीबीआयने हैद्राबाद, वाराणसी, विशाखापट्टणम, अहमदाबाद आणि पुण्यात ही कारवाई केली. हे रॅकेट ‘आत्रिया ग्लोबल सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड’, ‘एम/एस वि. सी. इन्फ्रॉमेट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘विआजेस सोल्यूशन्स’ या नावाने चालवले जात होते. जून २०२४ पासून हे बेकायदा कॉल सेंटर चालवले जात होते. सीबीआयच्या माहितीनुसार, या रॅकेटमध्ये साधारण ३० जण सक्रिय असून अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यांनी आर्थिक फसवणूक केली आहे.
आदित्य पटेल, वानराज साहिल, जितेंद्र रावल, हर्ष पटेल आणि रोहित बंजारा या पाच आरोपींना हैद्राबादमध्ये अटक करण्यात आली आहे. त्यानंतर पुण्यामधील न्यायालयात त्यांना हजर करण्यात आले. आरोपींचे वकील अॅड. पुष्कर दुर्गे यांनी सांगितले की, सीबीआयने आरोपींवर बेकायदा कारवाया केल्याचा आरोप केला आहे. ज्यामध्ये विदेशी नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचे म्हटले आहे. सीबीआयने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
या कारवाईत, सीबीआयने संबंधित कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे टाकले आणि महत्त्वाचे पुरावे जप्त केले. यामध्ये ५१ मोबाइल फोन, ३९ संगणक, हार्ड डिस्क आणि फसवणुकीशी संबंधित दस्तऐवजांचा समावेश आहे. या पुराव्यातून आरोपींच्या गुन्ह्यातील सक्रिय सहभाग स्पष्ट झाला आहे. आदित्य पटेल हा विआजेस सोल्यूशन्समध्ये आर्थिक व्यवहारांचा सुपरवायझर म्हणून काम करीत होता. साहिल वांझरा उर्फ एरिक हा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वाचा आरोपी आहे. त्याने विविध खोटी नावे धारण करून लोकांशी संवाद साधत त्यांना ठगवले. ॲमेझोन आणि फेडरल ट्रेड कमिशनचे अधिकारी असल्याचीदेखील त्याने बतावणी केली होती. अन्य आरोपी असलेले हर्ष पटेल आणि रोहित बंजारा यांनी तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि कॉल सेंटरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी, नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले की, तपासादरम्यान जप्त केलेल्या पुराव्यांमधून आरोपी ऑनलाइन पद्धतीने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करीत होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायबर गुन्ह्यात सक्रिय असल्याचे समोर आले आहे. याविषयी आमचा पुढील तपास सुरू आहे. अन्य आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
अशी होत होती फसवणूक
सीबीआयच्या तपासात अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी उघड झाल्या आहेत. आरोपी तंत्रज्ञान साहाय्यक प्रतिनिधी म्हणून काम करत होते. विदेशी नागरिकांना त्यांच्या संगणक प्रणालींना धोका असल्याची किंवा त्यांच्या वैयक्तिक माहितीची चोरी झाल्याची खोटी माहिती देत होते. आरोपींनी त्यांना त्यांच्या बँक खात्यातून पैसे आरोपींनी दिलेल्या बँक खात्यात वर्ग करण्यासाठी किंवा आंतरराष्ट्रीय गिफ्ट कार्ड खरेदी करण्यासाठी प्रवृत्त केले. असे केल्यास त्यांचे पैसे सुरक्षित राहतील असे सांगितले. जुलै २०२४ मध्ये दोन अमेरिकी नागरिकांना प्रत्येकी २० हजार डॉलर्सचा गंडा घालण्यात आला होता. या घोटाळ्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला होता. रिमोट ॲक्सेस सॉफ्टवेअरचा वापर करून लोकांच्या संगणक प्रणालींमध्ये प्रवेश मिळवीत ही फसवणूक करण्यात आली.