सीसीटीव्ही फुटेज अन् खबऱ्याचे जाळे; साताऱ्यात वृद्धाला लुटणारा ‘इराणी’ पुण्यात जेरबंद; शिवाजीनगर पोलिसांची धडक कारवाई…
पुणे : ज्येष्ठ नागरिकांची दिशाभूल करून हातचलाखीने पैसे लांबवणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पुणे शहराच्या शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. इब्राहिम बाबु इराणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्यावर पुणे शहर, ग्रामीण आणि रायगड परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत.
सातारा येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यात २७ मार्च २०२६ रोजी आयडीबीआय बँकेत एका वृद्ध महिलेची सात हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेजवरून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे अंमलदार महेंद्र कडू यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी शिवाजीनगर येथील इराणी वस्तीत असल्याची खात्री झाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पाटील आणि त्यांच्या पथकाने सापळा रचून इब्राहिमला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता, त्याने सातारा येथील गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचा ताबा सातारा पोलिसांकडे देण्यात आला असून, त्याने अशाच प्रकारे आणखी किती वृद्धांना लुटले आहे, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक (शाहूपुरी) करत आहेत.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, सहाय्यक पोलीस आयुक्त चंद्रकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीशकुमार दिघावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, तसेच कर्मचारी संतोष मेमाणे, सचिन जाधव, महेंद्र कडू आणि रोहित झांबरे यांच्या पथकाने केली.


