पिंपरी : समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक आणि नागपूर येथील तुरुंग प्रशासनात पोलीस पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एकाने तीन जणांची ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपयांची फसवणूक केली आहे. पिंपरी परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय व्यक्तीने संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंदापूर तालुक्यातील एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांची घरी भेट घेऊन त्यांना समाजकल्याण विभागात वरिष्ठ निरीक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगितले. तसेच त्यांचा पुतण्या आणि आणखी एकाला नागपूर येथील तुरुंग प्रशासनात पोलिसमध्ये भरती करून देतो, असे आमिष दाखवले. या बदल्यात त्याने वेळोवेळी फिर्यादी आणि त्यांच्या नातेवाईकांकडून एकूण ४३ लाख ८१ हजार ९८५ रुपये उकळले. मात्र, कोणालाही नोकरी न लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सहायक पोलीस निरीक्षक शेटे तपास करत आहेत.


