संग्रहीत छायाचित्र
पुणे: आई-वडील आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. नवसाने झालेल्या मुलाने आई-वडिलांना सांभाळण्यास नकार दिला. त्यामुळे आईवडिलांना मुलाविरुद्ध थेट न्यायालयाची पायरी चढावी लागली. मात्र न्यायालयाने निकाल देत मुलाने आईवडिलांना दैनंदिन खर्चासाठी पैसे द्यावे असे आदेश दिले आहे.
अॅड. जान्हवी भोसले यांनी या खटल्याबाबत सविस्तर माहिती दिली. तीन मुलींनंतर नवससायास करून आईवडिलांना चौथा मुलगा झाला. त्याला लहानाचे मोठे केले. पुण्यात एका खाजगी कंपनीत मुलगा नोकरीस लागला. वडील एका खाजगी कंपनीत नोकरीस होते. त्यांना १३०० रुपये पेन्शन आहे. मुलाचे लग्न झाले. मात्र लग्नानंतर सासू-सूनेचे न पटल्यामुळे मुलगा आपल्या पत्नीसोबत वेगळा राहण्यास गेला. त्याने एक घर घेतले. मात्र इकडे मिळणाऱ्या पेन्शनमध्ये आईवडिलांचे भागत नव्हते. मुलाने दैनंदिन खर्चासाठी काही रक्कम द्यावी अशी आईवडिलांची माफक अपेक्षा होती. मात्र अशी आर्थिक मदत करण्यास मुलाने नकार दिला.
आईवडील दोघेही आजारी होते. त्यांनी घर विकण्याचे ठरवले. मात्र मुलाने घरावर कर्ज काढले होते. हे कर्ज भरावे. म्हणजे घर विकून येणाऱ्या पैशात छोट्या घरात राहता येईल, असे आईवडिलांनी सांगितले. मात्र मुलाने त्याला देखील नकार दिला. त्यामुळे आईवडिलांना न्यायालयात जाण्यावाचून पर्याय उरला नाही.
खर्च अधिक असल्याने मदत देण्यास नकार
मुलगा एका खाजगी कंपनीत नोकरीस आहे. त्याला ६० हजार पगार आहे. त्याची पत्नी देखील कमावती आहे. आपल्यावर पत्नीची जबाबदारी आहे. घर, गाडी यांच्या कर्जाचे हप्ते असल्याने आपल्याला महिना ५८ हजार रुपये खर्च करावे लागतात. त्यामुळे आईवडिलांना कोणतीही आर्थिक मदत करण्यास मुलाने नकार दिला. कालांतराने मुलगा आईवडिलांच्या घरखर्चासाठी पाच हजार पुरेसे आहेत असे म्हणत ३७०० रुपये देण्यास तयार झाला. पेन्शनची रक्कम त्यात टाकून आईवडिलांचा खर्च भागेल असा त्याचा युक्तिवाद होता.
न्यायालयाचा निकाल
या प्रकरणी न्यायालयाने एका वर्षात निकाल दिला. आईवडिलांच्या बाजूने अॅड. जान्हवी भोसले आणि अॅड. भालचंद्र धापटे यांनी युक्तिवाद केला. न्यायालयाने मुलाने आईवडिलांना प्रत्येकी आठ हजार रुपये पोटगी द्यावी असा निकाल दिला आहे.
वडिलांना ब्रेन हॅमरेज
दरम्यान वडिल हे ब्रेन हॅमरेज झाल्याने आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. अजूनही त्यांचा सांभाळ कोण करणार असा प्रश्न आहे.