संग्रहित छायाचित्र
पुणे: कर भरण्याच्या बनावट नोंदी करून कोरेगाव पार्कमधील एका खाजगी कंपनीच्या रोखपालाने तब्बल दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी कंपनीचे मालक जिनेंद्र दिलीप दोशी (वय ३८, रा. कोरेगाव पार्क) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी रोखपालाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिनेंद्र दोशी यांची जेनसिस इव्हेंट मॅनेजमेंट नावाची कंपनी कोरेगाव पार्क येथे आहे. संशयित रोखपालाने दोशी आणि त्यांच्या भागीदारांचा विश्वास संपादन करून सर्व आर्थिक व्यवहार स्वतःच्या हातात घेतले. कर भरण्याच्या बनावट नोंदी करून त्याने वेळोवेळी सुमारे दोन कोटी रुपयांचा अपहार केला. ही रक्कम त्याने स्वतःच्या तसेच नातेवाईकांच्या बँक खात्यांमध्ये वळती केली.
सदर अपहार लेखापरीक्षणादरम्यान उघडकीस आला. या प्रकारानंतर दोशी यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मोरे करत आहेत.