येवलेवाडीतील काच कारखान्यातील दुर्घटनेप्रकरणी मालकासह पाचजणांविरुद्ध गुन्हा
परराज्यातून आलेल्या काचांचा माल उतरवताना झालेल्या दुर्घटनेत चार कामगारांना जीव गमवावा लागला होता तर, अन्य चौघे जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कोंढव्यातील येवलेवाडी परिसरातील काच कारखान्यात रविवारी दुपारी झालेल्या या दुर्घटनेप्रकरणी कारखाना मालकासह एकूण पाच जणांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यातील कारखाना चालकासह तिघांना न्यायालयीन कोठडी दिली आहे.
कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना न करणे, तसेच सुरक्षाविषयक साधने न पुरविल्याप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामधील तिघांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींमध्ये कारखाना चालकाचा समावेश आहे.
या प्रकरणी इंडिया ग्लास सोल्युशन्सचे मालक हुसेन तय्यबरअली पिठावाला (वय ३८, रा. थ्री ज्वेलर्स सोसायटी, टिळेकरनगर कोंढवा), हातीम हुसेन मोटारवाला (वय ३६, रा. येवलेवाडी, कोंढवा), गाडी मालक संजय धुळा हिरवे (वय ३४, रा. कळंबोली, नवी मुंबई), ठेकेदार सुरेश उर्फ बबन दादू चव्हाण, गाडीचालक राजू दशरथ रासगे (वय ३०, कळंबोली, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील पिठावाला, मोटारवाला आणि रासगे यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणी दयानंद ज्ञानदेव रोकडे (वय ३६, रा. शिवसृष्टी, दांडेकर वस्ती, येवलेवाडी) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अमित शिवशंकर कुमार (वय २७ वर्ष), विकास सरजू प्रसाद गौतम (वय २३), धर्मेंद्र सत्यपाल कुमार (वय ४०) आणि पवन रामचंद्र कुमार (वय ४४ , सध्या रा. धांडेकरनगर, येवलेवाडी) या कामगारांचा दुर्घटनेत मृत्यू झाला होता. जगतपाल संतराम सरोज (वय ४९), मोनेश्वर कुली (वय ३४), पिंटू नवनाथ इरकल (वय ३०), तसेच फिर्यादी दयानंद रोकडे हे जखमी झाले आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, येवलेवाडी रस्त्यावर सीएनजी पंपामागे इंडिया ग्लास सोल्युशन नावाचा काच तयार करण्याचा मोठा कारखाना आहे. शहरातील गृहप्रकल्पांना तसेच व्यावसायिक कार्यालयांसाठी लागणाऱ्या काचांचा पुरवठा या कारखान्यामार्फत केला जातो. या कारखान्यामध्ये मोठ्या काचांच्या प्लेट येतात. या मोठ्या प्लेट कापून त्याचे मोठाले तुकडे केले जातात. त्यांना पॉलिश केले जाते.
नेमके काय घडले होते?
कच्चा माल असणाऱ्या काचांच्या तुकड्यांचा ट्रक ठेकेदाराने रविवारी दुपारी कारखान्यात आणला. तेथील मजूर जड वजनाच्या काचा उतरवत होते. काचेचे जड तुकडे खाली उतरवताना त्यांना बांधण्यात आलेला पट्टा तुटला आणि दोन टन वजनाचे काचेचे तुकडे मजुरांच्या अंगावर पडले. अंगात काचा शिरल्याने चार कामगार जागीच मृत्यमुखी पडले. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कामगार मूळचे उत्तर प्रदेशातील रायबरेली जिल्ह्यातील आहेत.