संग्रहित छायाचित्र
पुणे: तरुण आणि किशोर वयातील मुलांच्या भावना अतिशय तीव्र होत असल्याचे मागील काही दिवसांपासून समोर येत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण, गुन्हेगारी आदी गुन्ह्यांमधील आरोपींमध्ये या वयातील आरोपींची संख्या सर्वाधिक आहे. अतिशय किरकोळ कारणावरून गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यांच्याकडून होत आहेत. बारामतीमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा त्याच्याच वर्गमित्रांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ३०) सकाळी घडला. महाविद्यालयाच्या आवारातच घडलेल्या प्रकारामुळे शहरात व तालुक्यात खळबळ उडाली.
खून झालेला विद्यार्थी आणि आरोपी एकाच वर्गात शिकण्यास आहेत. साधारणपणे एक महिन्यापूर्वी दुचाकीला ‘कट’ मारल्याच्या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाले होते. त्यामधूनच हा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. सोमवारी सकाळी जेव्हा हा मुलगा कॉलेजमध्ये आला तेव्हा आरोपी मुलांनी त्याला हेरले. बॅगमधून सोबत आणलेल्या कोयत्याने त्याच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात संबंधित विद्यार्थी जागीच गतप्राण झाला. तिथून पळून जात असताना दोघांपैकी एकाला महाविद्यालयाच्या सुरक्षारक्षकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दुसरा पसार होण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी तातडीने महाविद्यालयाच्या परिसरात नाकाबंदी केली. तत्काळ पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. गंभीर जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.