संग्रहित छायाचित्र
पुणे : एका आयटी अभियंत्याने आपल्याला लाकडी दांडके आणि शस्त्रधारी तरुणांनी पाठलाग करून लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला असून याप्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २९ सप्टेंबर रोजी लवळे-नांदेड रस्त्यावर घडली असून ४० जणांनी हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याविषयीचा एक व्हिडिओ त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट केला आहे. दरम्यान, पोलिसांनी मात्र याविषयी वेगळाच दावा केला आहे. रात्रीच्या वेळी या भागात ड्रोन वाढले असून सुरक्षेसाठी पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते आणि पोलीस गस्त घालतात. संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाते. या ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांना लुटारू समजून गैरसमजातून ही तक्रार देण्यात आल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
रवी नारायण कर्णानी (वय ४२, रा. सुसगाव, ता. मुळशी) यांनी फिर्याद दिली आहे. कर्णानी हे हा आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करतात. ते पत्नीसह त्यांच्या मोटारीमधून २९ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास लवळेगाव ते नांदे असे निघालेले होते. त्यावेळी त्यांना रस्त्यावर दुचाकी घेऊन थांबलेल्या काही तरुणांनी गाडी थांबविण्यास सांगितले. त्यांनी ही गाडी थांबवली नाही. ते पुढे निघालेले असतानाच त्यांचा दुचाकीवरुन पाठलाग सुरू करण्यात आला. या दुचाकीस्वार तरुणांनी हातातील लोखंडी दांडक्याने गाडीच्या दरवाजावर तसेच बंपरवर मारून नुकसान केल्याचे नमूद करण्यात आले आहे. तेथून काही अंतरावर उभ्या असलेल्या एका अज्ञात व्यक्तीने देखील गाडीवर मारल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. काठ्या, रॉड आणि दगडांनी हा हल्ला केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी स्थानिक गुंडांनी हा हल्ला केला होता असा आरोप केला आहे. अनेकदा गाड्यांना लक्ष केले जाते. विशेषत: स्थानिक नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांना लक्ष करतात. गस्त घालणारे स्थानिक पोलीस याला पायाबन्द घालण्याऐवजी हल्लेखोरांना साथ देत असल्याचा आरोप कर्णानी यांनी केला आहे.
दरम्यान, पौड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी ‘मिरर’शी बोलताना सांगितले, की मुळशी आणि मावळ परिसरात ड्रोन वाढले आहेत. ड्रोनची संख्या वाढली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पोलीस पाटील, ग्राम सुरक्षा दलाचे कार्यकर्ते, स्थानिक पोलीस एकत्रित गस्त घालत असतात. रस्त्यावर संशयित वाहनांची तपासणी केली जाते. तसेच, आवश्यकतेनुसार वाहनचालकांकडे चौकशी केली जाते. फिर्यादी कर्णानी हे त्यांची गाडी घेऊन मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास लवळे-नांदे रस्त्याने जात होते. पौडकडून नांदे गावाकडे जात असताना पोलीस आणि ग्राम सुरक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी थांबवण्याचा इशारा केला. मात्र, त्यांनी गाडी थांबविण्याऐवजी जोरात गाडी दामटविली. त्यावेळी लोकांना संशय आला. या गाडीत चोर तर नसावेत ना असा संशय आल्याने त्यांनी पाठलाग सुरू केला. ग्राम रक्षक दलाच्या कार्यकर्त्यांच्या हातात स्टीलचा रॉड होता. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी ही गाडी थांबली नसून त्यामध्ये काही संशयास्पद असल्याची शक्यता असल्याची माहिती पुढील गावात गस्तीवर असलेल्यांना कळवली. पुढच्या गावात देखील ही गाडी थांबविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, कर्णानी यांनी गाडी थांबविली नाही. त्यांनी ही गाडी आणखी जोरात पळविण्या सुरुवात केली. त्यामुळे काही तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. गाडी थांबवा असे सांगण्यासाठी त्यांना काठीने इशारा केला. तसेच, गाडी थांबत नसल्याचे पाहून दरवाजावर काठी मारली असे निरीक्षक गिरीगोसावी यांनी सांगितले. एकूणच या प्रकरणात दोन्ही बाजूने वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. पोलिसांचा याविषयी तपास सुरू असून जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.