पुणे : गुरुवार पेठेतील एका होलसेल दुकानातून तब्बल ७० किलो चांदी आणि रोख रक्कम असा ६७ लाखांहून अधिक किंमतीचा ऐवज लांबविणाऱ्या आरोपीला खडक पोलिसांनी उत्तरप्रदेशमधून जेरबंद केले आहे. या कारवाईत पोलिसांनी ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदीची दागदागिने, ज्याची बाजारभावानुसार किंमत सुमारे ४८ लाख रुपये आहे, असा मोठा माल हस्तगत करण्यात यश मिळवले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी विनोद देवीचंद परमार यांच्या गुरुवार पेठेतील दुकानाचे कुलूप तोडून १४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर दरम्यान चोरट्यांनी ही मोठी चोरी केली होती. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अर्जुन कुदळे व पोउपनि महेंद्र कांबळे यांच्या दोन विशेष पथकांनी तपास सुरू केला.
तपासादरम्यान परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने छाननी करण्यात आली. आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे बदलून रेल्वेने उत्तरप्रदेशकडे रवाना झाल्याचे उघड झाले. त्यानंतर खडक पोलिसांचे पथक विना विलंब उत्तरप्रदेशला रवाना झाले. कुंडा (जि. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) येथून मुख्य आरोपी राजेश महाराणीदिन सरोज (वय ३६, रा. माघी चैनगड, कुंडा, प्रतापगढ, यूपी) याला ताब्यात घेण्यात आले.
पुढील तपासात पोलिसांनी आरोपी व त्याच्या नातेवाईकांकडे कसून चौकशी केली असता ३६ किलो ४४२ ग्रॅम चांदीचा ऐवज हस्तगत करण्यात यश आले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी हे उत्तरप्रदेशातील असून त्यांचे बहुतांश साथीदार पुणे व मुंबई येथे हमाली व मजुरीच्या कामाच्या निमित्ताने येऊन अशा प्रकारचे गुन्हे करतात.
या कारवाईत अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त कृषीकेश रावले, सहा. पोलीस आयुक्त अनुजा देशमाने, तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला. यामध्ये गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक शर्मिला सुतार, मनोजकुमार लोंढे, सहा. पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, पोउपनि महेंद्र कांबळे, स्वप्निल बनकर, पोलीस हवालदार हर्षल दुडम, किरण ठवरे, अजित फरांदे, पोलीस अंमलदार अक्षयकुमार वाबळे, कृष्णा गायकवाड, निलेश दिवटे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, योगेश चंदेल, विकास पांडोळे, मयुर काळे, शोयब शेख, अर्जुन कुडाळकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.


